पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी ५ कोटी १८ लाख रुपयांचे दान केले. तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्त निवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ कोटी ६१ लाख रुपये उत्पन वाढल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी कार्तिकी यात्रेला यंदा पावसाचा फटका बसला. यंदा यात्रेला भाविकांची संख्या कमी झाली. यात्रा काळात २२ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ४८ लाख ८ हजार २८९ रुपये अर्पण केले. तर मंदिर समितीला १ कोटी २७ लाख १९ हजार ५२० रुपये देणगी स्वरूपात प्राप्त झाले. लाडू प्रसाद विक्रीतून ५४ लाख १६ हजार ५०० रुपये, भक्तनिवास शुल्क म्हणून ७१ लाख ५९ हजार ९१० रुपये, तर हुंडीपेटीत १ कोटी ७७ लाख १५ हजार २२७ रुपये जमा झाले आहेत. याशिवाय देवापुढील पूजेतून ५० हजार रुपयांचे उत्पन्न समितीला प्राप्त झाले आहे. तसेच देवाला यंदाच्या यात्रेत तीन लाख ३६ हजार ८७६ रुपये सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले आहेत.

याशिवाय अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाइल लॉकर आदी माध्यमातून ६ लाख ७० हजार ९०६ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे विविध माध्यमांतून समितीच्या तिजोरीत ५ कोटी १८ लाख उत्पन्न जमा झाल्याची माहिती शेळके यांनी दिली आहे.

मंदिर समितीला मागील वर्षीच्या कार्तिकी यात्रेत ३ कोटी ५७ लाख ४७ हजार ३२२ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. एक प्रकारे यंदा यामध्ये १ कोटी ६१ लाख रुपयांची वाढ होत हे ५ कोटी १८ लाख रुपये झाले आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी सांगितले.