पंढरपूर : तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांची बदनामी टाळण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला १० लाख रुपये घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. किरण घोडके या सामाजिक कार्यकर्त्याने या प्रकरणी १ कोटी रुपयाची मागणी केली होती.

त्यापैकी १० लाख रुपये घेताना पोलिसांनी रंगेहाथ पडकले आहे. घोडके विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली आहे.

येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात नुकतेच पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. यात कामगारांचे वेतन थकल्याप्रकरणी हे आंदोलन किरण घोडके यांनी केले. हे आंदोलन मागे घेतल्यावर कारखान्याने तातडीने प्रश्न मार्गी लावला. मात्र, तरीही घोडके हे आमदार अभिजीत पाटील आणि विठ्ठल कारखान्याविरोधात बोलत होते. या बाबत किरण घोडके यांनी हा वाद मिटवण्यासाठी आमदार पाटील यांचे स्वीय सहायक नितीन सरडे यांच्याकडे एक कोटीची मागणी केली.

त्यानंतर सरडे यांनी शहर पोलीस ठाण्यात या बाबत माहिती दिली. त्यानुसार किरण घोडके यांना आगाऊ रक्कम किती द्यायची आणि कुठे याची विचारणा सरडे यांनी केली. त्यावर किरण घोडके यांनी १० लाख रुपये द्या, असे सांगितले. पोलिसांनी या रकमेच्या नोटांचे नंबर आणि काय करायचे ते सरडे यांना सांगितले. त्यानुसार एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास घोडके आले होते.

यावेळी किरण यांनी पैशाची मागणी केली. सरडे यांनी पैसे आणलेली पिशवी दाखवली. ती किरण याने स्वीकारली आणि जात असताना साध्या वेशातील पोलिसांनी किरण घोडके याला पकडले. या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नितीन सरडे यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खंडणीच्या या घटनेने सामाजिक कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले असून, आमदाराला खंडणी मागितल्याने खळबळ उडाली आहे.