पंढरपूर : ‘आता कोठे धांवे मन। तुझे चरण देखिलिया।’ या अभंगाची प्रचिती पंढरीत आलेल्या भाविकांना आली. आषाढी एकादशीला पंढरीत भाविकांची विक्रमी गर्दी दिसून आली. टाळ-मृदंग, हरिनामाच्या जयघोषाने पंढरी नगरी अक्षरशः दुमदुमून निघाली. एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. दरम्यान, विठ्ठलाच्या दर्शनाला एकादशीच्या दिवशी १६ ते १७ तास लागत होते. माझ्या जीवाची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी। या अभंगाप्रमाणे लाखो भाविक वारीला पंढरीत दाखल झालेत. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पायी पंढरपूरला चालत येतात. एकादशीला चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, देवाचे दर्शन याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा राज्यात सुरुवातीला पावसाने जोर लावल्याने आषाढी वारीला भाविकांची संख्या वाढेल, असा अंदाज प्रशासनाचा होता.

एकादशीच्या दिवशी पंढरीत सुमारे १७ ते १८ लाख भाविक दाखल झाले आहेत. येथील मठ, धर्मशाळा, भक्तनिवास, लॉज, मोकळ्या जागेत राहुट्या, तंबू टाकून भाविक विसावले आहेत. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर परिसर भाविकांनी फुलला आहे. मंदिर परिसर, नगर प्रदक्षिणा, वाळवंट आदी ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली. एकादशीला पहाटे भाविकांनी स्नान केले. यावेळी पोलीस प्रशासनाने काही ठिकाणी एकेरी मार्ग तसेच जाणारे व स्नान करून माघारी येणाऱ्यांसाठी वेगळा मार्ग केला. त्यामुळे गर्दी, चेंगराचेंगरी झाली नाही.

एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली. नाशिक जिल्ह्यातील कैलास आणि कल्पना उगले या दाम्पत्याला मानाचे वारकरी म्हणून महापूजेचा मान मिळाला. श्री विठ्ठल मंदिराला एकादशीनिमित्त आकर्षक फुलांची आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. यंदा प्रशासनाने ठिकठिकाणी आरोग्य सुविधा, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीच्या ठिकाणी ‘ड्रोन’ची मदत घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या. तसेच शहरात २५ ठिकाणी ‘वायफाय’ सुविधा उपलब्ध केल्या होत्या. यंदा दर्शन रांगेत ‘जर्मन हँगर’चे तीन मंडप उभारण्यात आले होते. एकादशी दिवशी दुपारी १२ वाजता पदस्पर्श दर्शन करण्यासाठी १६ ते १७ तास लागत होते. यंदा दर्शनरांगेत विविध सुविधा देण्यात आल्या होत्या. दरम्यान, पंढरी नगरीत जिथे पाहावे तिथे भाविकांची गर्दी, हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंग आणि भजन कीर्तनामुळे पंढरी दुमदुमून निघाली.