अहिल्यानगर : पंडित दीनदयाळ पतसंस्था व पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीने दि. ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला माउली सभागृहात सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. व्याख्यानमालेचे उद्घाटन केरळचे राज्यपाल राजेंद्र पार्लेकर यांच्या हस्ते होणार आहे.
सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही, शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते, असे विचार मांडणाऱ्या दीनदयाळ यांच्या राष्ट्रनिर्मिती संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेचे हे ११ वे वर्ष आहे. पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या माध्यमातून शहरातील सांस्कृतिक चळवळीला बळ मिळावे, विविध क्षेत्रांतील विचारवंत, साहित्यिक, राजकीय नेत्यांमार्फत शहराला दिशा देण्याचे प्रयत्न होत असल्याचे लोढा यांनी सांगितले.
गुरुवारी (दि. ९) जगाचे बदलते रूप आणि भारताचा वाटा या विषयावर प्रफुल्ल केतकर यांचे व्याख्यान होईल. उद्घाटन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव आहेत. शुक्रवारी (दि. १०) राष्ट्रप्रेम ही युवकांच्या स्वप्नांची प्रेरणा या विषयावर अतिरिक्त पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई) विश्वास नांगरे पाटील यांचे, प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, चित्रपट निर्माते हरीश भिमाणी व डॉ. सुधा कांकरिया आहेत. शनिवारी (दि. ११) एकता, बंधुता, राष्ट्रप्रेम इस्लामी संस्कृतीचे खरे तत्व या विषयावर राष्ट्रीय मुस्लिम मंच अध्यक्ष फैज खान यांचे, यावेळी प्रमुख पाहुणे खासदार नवनीत राणा व पतसंस्था चळवळीचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत भालेराव आहेत.
व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर पगारिया, मानद सचिव विकास पाथरकर, संचालक मिलिंद गंधे, नीलेश लोढा, बाबासाहेब साठे, शैला चंगेडे, व्यवस्थापक नीलेश लाटे तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे, सचिव बाळासाहेब भुजबळ, कार्याध्यक्ष सुरज अग्रवाल, उपाध्यक्ष अशोक कानडे, अनुराग धूत, राहुल जामगावकर प्रयत्नशील आहेत.