परभणी : जून महिना शेवटाकडे जात असताना अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्याच्या अनेक भागांत झालेल्या पेरण्याही सद्यस्थितीत संकटात सापडल्या आहेत. कापूस लागवड तसेच सोयाबीन पेरणी केलेले अनेक शेतकरी आता दुबार पेरणीच्या भितीने धास्तावले आहेत.दरवर्षी जूनच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात पेरण्यांना प्रारंभ होतो. तत्पूर्वी आश्वासक असा पाऊस झालेला असतो.

मे महिन्यात एक-दोन वेळा अवकाळी पाऊस होतो पण त्यामुळे पेरण्यांना सुरुवात होत नाही. यावर्षी मात्र मे महिन्यात अतिशय जोरदार पाऊस झाला. गेल्या पंधरा वर्षांमध्ये असा पाऊस झाला नव्हता. हा पेरणी योग्य पाऊस नसून, शेतकऱ्यांनी एवढ्या पावसावर पेरणी करू नये, असे सातत्याने हवामान विभागाच्या वतीने सांगितले जात होते. तथापि या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली. अद्यापही पेरणी न केलेले शेतकरीही मोठ्या संख्येने आहेत. पण ज्यांनी पेरणी केली ते मात्र सद्यस्थितीत धास्तावले आहेत.

मे महिन्यात झालेल्या पावसानंतर जून महिन्यात जो पाऊस झाला तो केवळ ७१.२ मिलिमीटर एवढाच आहे. तरीही जिल्ह्याच्या अनेक भागांत कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. परभणी जिल्ह्यात कापूस व सोयाबीन ही दोन प्रमुख नगदी पिके घेतली जातात. जिल्ह्यात खरीप हंगामाखालील क्षेत्र साडेपाच लाख हेक्टर आहे. ज्या भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली तेथील पिके आता उगवली आहेत. आता पावसाची निकड असताना दररोजच केवळ जोरदार वारे आणि ऊन पडत असल्याने मातीतली आर्द्रता नष्ट होत आहे. जमिनीतली ओल संपत चालल्याने झालेली पेरणी संकटात सापडली आहे. काही ठिकाणी पेरण्याच रखडल्या तर काही ठिकाणी झालेल्या पेरण्यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जून महिना संपत चाललेला असताना अजूनही जोरदार पाऊस न झाल्याने ग्रामीण भागात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.