सावंतवाडी : सावंतवाडी येथील एसटी बस स्थानकाची सध्या दुरवस्था झाली असून, पावसामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकावर पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे, तसेच छप्परही गळत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अत्याधुनिक दर्जाचे बस स्थानक कधी बनेल याची वाट न पाहता, सध्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे.

माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी बस स्थानक आधुनिक दर्जाचे बनवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. यापूर्वी बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी भूमिपूजन झाले होते आणि यांत्रिक विभागाचे काम होऊन इमारतही उभी राहिली होती. मात्र, एसटी बस स्थानकाचे काम रखडल्याने त्यासाठीचा निधी परत गेला. आता ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’  या तत्त्वावर नवीन बस स्थानक उभारण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर प्रवाशांच्या थांबण्याच्या ठिकाणी पाणी साचून अक्षरशः तळं निर्माण होते, ज्यामुळे ये-जा करणेही कठीण होते. छप्पराच्या गळतीमुळेही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आमदार केसरकर यांनी आधुनिक दर्जाच्या बस स्थानकाची घोषणा केली असली तरी, त्यापूर्वी या पावसाळ्यात प्रवाशांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी प्रवासी वर्गातून सातत्याने केली जात आहे. भविष्यातील सुविधांचे आश्वासन महत्त्वाचे असले तरी, सध्याच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.