सोलापूर : एकीकडे बोरामणी आंतरराष्ट्रीय काॅर्गो विमानतळ उभारणी रखडलेली असताना दुसरीकडे सोलापूरच्या होटगी रस्त्यावरील जुन्या विमानतळावरील बहुप्रतीक्षित विमानसेवा उशिरा का होईना, अखेर सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये विमानसेवेचा परवाना मिळाल्यानंतर पुढील ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सोलापूरचे सध्याचे छोटेखानी, जुने विमानतळ अवघे ३५० एकर क्षेत्रफळ आकाराचे आहे. या विमानतळावरून यापूर्वी फेब्रुवारी २००९ मध्ये सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने किंगफिशर रेड कंपनीने आठवड्यातून चार दिवस मुंबई-सोलापूर-मुंबई दरम्यान ७२ आसनी विमानसेवा सुरू केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असतानाच अचानकपणे ही विमानसेवा ऑगस्ट २०१० मध्ये बंद झाली. त्यानंतर गेली १४ वर्षे सोलापूरची विमानसेवा प्रतीक्षेत राहिली असताना दुसरीकडे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रातील वजन वापरून सोलापूरजवळ बोरामणी परिसरात सुमारे दोन हजार एकर जमीन संपादित करून आंतरराष्ट्रीय काॅर्गो विमानतळ उभारण्याचा मार्ग खुला केला होता. आवश्यक भूसंपादन होऊनही या आंतरराष्ट्रीय विमानतळाची विमानसेवा आजतागायत रखडली आहे. यात वन विभागाच्या आरक्षित जमिनीचा अडसर असल्याचे सांगितले जाते. परंतु त्यावर मार्ग निघाला नाही.
हेही वाचा – सोलापूर : नदीत पडलेल्या शेळीला वाचविताना नदीच्या प्रवाहात तरुण वाहून गेला
या पार्श्वभूमीवर जुन्या विमानतळाच्या माध्यमातून २०१७ मध्ये मोदी सरकारने देशात जाहीर केलेल्या उडान योजनेत सोलापूरचाही समावेश केला होता. परंतु विमानतळावरील त्रुटी दूर करता आल्या नाहीत. त्यामुळे उडान योजनेच्या माध्यमातून सुरू होणारी विमानसेवा दृश्य पटलावर कधीही आली नाही.
अलीकडे विमानतळाला लगतच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उंच चिमणीचा अडथळा असल्याचे सांगण्यात आले असता, त्यावर मोठा वाद झाला. अखेर वादग्रस्त चिमणी गेल्या वर्षी पाडण्यात आली. त्यानंतर विमानतळ सुसज्ज करून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. यात लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसत असताना सुदैवाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः या प्रश्नावर उच्च स्तरावरून पाठपुरावा केला. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. विमानतळाच्या सुधारणांसाठी प्रथमच जिल्हा नियोजन समितीने आर्थिक निधी उपलब्ध करून दिला आहे.
विमानतळावर संरक्षक भिंतीसह चार धावपट्टींची बांधणी, विमान रात्री उतरण्याची सोय, वाहतूक नियंत्रण कक्षाची बांधणी, धावपट्टी दर्शवणारे दिवे (पापी लाइट्स), सिग्नल यंत्रणा, सामान तपासणी यंत्रणा आदी कामांची पूर्तता झाली असून, त्या अनुषंगाने अलीकडेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एअरपोर्ट ॲथाॅरिटी ऑफ इंडिया) या विमानतळावर नवीन चार धावपट्टीसह इतर अत्यावश्यक बाबींची व्हीटीसीएनएस बी-३५० या विमानाने चाचणी केली. यात काही किरकोळ त्रुटी आढळून आल्या असून, त्याची तत्काळ पूर्तता केली आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या सप्टेंबरमध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पथक सोलापुरात दाखल होऊन विमानतळावरील सर्व सोई-सुविधांची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. हे पथक लवकर पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत पाठपुरावा करीत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये विमानसेवेसाठी परवाना मिळण्याचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा असून, नंतर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यासाठी दोन नागरी विमान वाहतूक कंपन्यांशी संपर्क साधून विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सोलापूरची विमानसेवा तत्काळ सुरू करण्याची, तसेच बोरामणी आंतरराष्ट्रीय काॅर्गो विमानतळाची रखडलेली उभारणी प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.