स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची ‘शुगर लॉबी’ एकवटली आहे. हातकणंगलेत माझ्या विरोधात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व माढय़ामध्ये सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांना उभे करण्यात आले आहे. पवार यांनी कितीही ताकद उभी केली तरी स्वाभिमानी दोंन्ही मतदारसंघात निश्चितपणे विजय प्राप्त करेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केला. महायुतीमध्ये आरपीआय,स्वाभिमानी, रिपाइं, रासप यांचा समावेश झाल्याने ताकद वाढली असून राज्यात ३५ जागांवर विजय प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.    
लोकसभा निवडणुकीसाठी लोकहिताचे विषय घेऊन महायुती लोकांसमोर जाणार आहे, असा उल्लेख करून शेट्टी म्हणाले, टोलमुक्त महाराष्ट्र, राज्यातील शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, विकलेल्या साखर कारखान्यांची चौकशी, सिंचन घोटाळ्यांची चौकशी हे विषय आम्ही लोकांसमोर पोहोचविणार आहोत. या माध्यमातून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणार आहोत. आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी असून ते महायुतीकडे सत्ता सोपवतील असा विश्वास वाटतो.    
राज्य गारपीटग्रस्त झाले असतांना शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे केवळ दौरे करून सहानभुती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांना मदत करण्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत असा आरोप करून शेट्टी म्हणाले, आचारसंहितेचा बागुलबुवा निर्माण करून शेतक-यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. आचारसंहितेबाबत निवडणूक आयोगाकडे मी पत्रव्यवहार केलेला आहे. आयोगाने नैसर्गिक आपत्तीच्या काळात आचारसंहितेची अडचण येऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे. तरीही राज्य शासन शेतक-यांपर्यंत मदत पोहोचवितांना दिसत नाही. शासनाला खरोखरच मदत करायची असती तर त्यांनी पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा तसेच शेतक-यांची वीजतोडणी थांबविण्याचा निर्णय घेतला असता.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आवाडे गटाचा पाठिंबा मिळाल्यामुळे स्वाभिमानीचा विजय झाला, याचा इन्कार करून शेट्टी म्हणाले, गेल्या वेळी मी स्वबळावर विजयी झालो होतो. आवाडेंची कसलीही मदत आपल्याला मिळालेली नव्हती. या वेळी आवाडे माझ्या विरोधात उभे आहेत. तरीही या निवडणुकीत मी विजयी होणार आहे. त्यामुळे आवाडे यांचा पाठिंबा होता की नाही हे आपसूक सिध्द होईल, असा दावा त्यांनी केला. या वेळी खासदार या नात्याने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा शेट्टी यांनी घेतला. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे उपस्थित होते.