रविवारचा (२७ ऑगस्ट) दिवस हिंगोलीतील उद्धव ठाकरेंची निर्धार सभा आणि अजित पवारांची बीडमध्ये उत्तरसभेमुळे गाजला. हिंगोलीतून उद्धव ठाकरेंनी शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपावर जोरदार टीका केली. तर, बीडमधून अजित पवारांसह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनजंय मुंडे यांनी हल्लाबोल केला. याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “बीडमध्ये काल जबरदस्तीने आणलेली लोकं होती. उद्धव ठाकरेंच्या हिंगोलीच्या सभेत जिवंतपणा होता. पण बीडमध्ये अजित पवारांच्या सभेत मुडदाडपणा होता. लोकांची बसण्याची इच्छा नव्हती.”

हेही वाचा >> “गुजरातला जाणं अपराध आहे का?”, शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्यावर राऊतांची टीका; म्हणाले, “एक काळ असा होता की…”

“बोलणार काय, सांगणार काय? बेईमानी केली म्हणून सांगणार? पक्ष फोडला म्हणून सांगणार? आपल्या लोकांशी गद्दारी केली म्हणून सांगणार? की जनतेच्या मतांशी प्रतारणा केली म्हणून सांगणार? कशासाठी गेले म्हणून सांगणार? हे सर्व दिसतंय. त्यामुळे लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. गाडी लावली की बसा, बघुया या दृष्टीने येतात आणि लोकांचा भ्रमनिरास झाला की लोक निघून जातात. यांच्या सभांना काहीही अर्थ राहणार नाही. जनतेने निर्णय घेतला आहे की यांची जिरवाची”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.