सोलापूर : प्रत्येकी दहा हजार रुपयांचे आमिष दाखवून तीन महिलांना ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी गळ घातल्याप्रकरणी एका धर्मगुरूविरुद्ध सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील वांगी रस्त्यावरील भूषण नगरात हा प्रकार घडला.

सोलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत पीडित ५० वर्षांच्या महिलेने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एका धर्मगुरूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी सांगितले की, हा धर्मगुरू नऊ वर्षांपासून पीडित महिलेच्या घरासमोर त्याच्या कुटुंबीयांसह राहतो. त्याने घरासमोर तात्पुरत्या स्वरूपाचे प्रार्थनास्थळ उभारले आहे.

या प्रार्थनास्थळामध्ये येत जा आणि आमच्या धर्माची गाणी ऐकून म्हणत जा, असेही हा धर्मगुरू सांगत असे. त्याने पीडित महिलेसह अन्य दोन महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित धर्मगुरूने एका महिलेला लाल रंगाचे पाणी प्यायला दिले. दुसऱ्या एका महिलेला तुमच्या मुलाचे लग्न जमत नसेल तर तुम्ही आमच्या धर्मात या, लगेच तुमच्या मुलाचे लग्न जमेल, असेही आमिष त्याने दाखविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.