अलिबाग : खालापूर तालुक्यात कर्जत खोपोली रेल्वे मार्गाजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून, खून करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात पोलीसांना यश आले आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथून आरोपीला जेरबंद केले आहे.२६ एप्रिलला दुपारी एक वाजेच्या सुमारास कर्जत खोपोली रेल्वे मार्गावर नावंढे गावच्या हद्दीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. ४० ते ५० वयाच्या या व्यक्तीचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने जखम करून त्याचा खून करण्यात आला होता. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर दगड रचून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१),२३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्ष्यात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांनी सहा. पोलीस निरीक्षक नागेश कदम आणि पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली होती. यात १२ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. मृताची ओळख पटवणे आणि आरोपीचा शोध घेणे अशा दोन पातळ्यांवर तपास पथकांचे काम सुरू झाले. तांत्रिक माहिती आणि कौशल्य पणाला पोलीसांनी शोध मोहीम सुरु केली. गोपनीय सुत्रांकडून याबाबतची माहिती संकलित केली गेली. तांत्रिक तपासामधुन सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हा उत्तरप्रदेश राज्यातील उन्नाव जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे तपासात समोर आले.

या नुसार पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर आणि ४ अंमलदार यांना तात्काळ रवाना करण्यात आले. या पथकाने लवकुश राजा पासवान वय-24, यास कुलाहा जि.उन्नाव उत्तरप्रदेश यास त्याचे राहते गावातुन ताब्यात घेतले. त्याची अलिबाग येथे आणून कसून चौकशी केली. तेव्हा त्याने केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली.गुन्ह्यातील मयत सुभाष त्रिलोकब्रिज विश्वकर्मा हा गोदरेज कंपनील कामास होता. तो चार पाच दिवसांपूर्वीच आरोपी लवकुश पासवान याच्या शेजारी राहण्यास आला होता. दोघांची ओळख झाल्याने एकमेकांसोबत दोघेही नशापान करण्यासाठी बसले होते. या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. शिविगाळ झाल्याने वाद विकोपाला गेले. त्यामुळे लवकुश याने सुभाषला खाली पाडून त्याच्या डोक्यात आणि छातीवर भलामोठा दगड मारून ठार केले. नंतर रेल्वे मार्गाशेजारी मृतदेह नेऊन टाकला. तो दिसून येवू नये म्हणून त्याच्या मृतदेहावर दगडेही रचली, आणि रेल्वेने मुळ गावी निघुन गेला. मात्र पोलिसांनी तपासाची सुत्र फिरवली आणि त्याला उत्तरप्रदेश येथे जाऊन जेरबंद केले.

या तपासात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर, सहा.पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, पोलीस हवालदार प्रतिक सावंत, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, रविंद्र मुढें, अक्षय जाधव, जितेंद्र चव्हाण, अक्षय पाटील, पोलीस शिपाई तुशार कवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.