सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे मका पिकात लागवड केलेला १५ लाखांचा गांजा हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी दिली. बस्तवडे ते वायफळे या रस्त्यावर चव्हाण वस्तीवरील शेतात गांजालागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक कुमार पाटील, हवालदार अमोल ऐदळे, आमसिद्धा खोत, बाळासाहेब माने, संदीप पाटील आदींच्या पथकाने छापा मारला असता मका व हत्ती गवत असलेल्या शेतात गांजाची झाडे आढळली. या झाडांची पाने, फुले, तयार बोंडे यांचा वापर नशेसाठी करण्यात येतो.

तीन ते सात फुटांपर्यंत पूर्ण वाढ झालेल्या या झाडांचे वजन १४८ किलो, तर वाळलेला गांजा आढळला, त्याचे वजन १ किलो ३१० ग्रॅम आढळले. एकूण सुमारे १५ लाख २ हजारांचा १५० किलो गांजा या ठिकाणाहून जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी शेतमालक अजय चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांजा विक्रीत सक्रिय असलेल्या हुसेन बादशाह सय्यद (वय २७ रा. मिरज) या तरुणावर हद्दपारीची कारवाई शनिवारी करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले. नशामुक्त अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध अवैध गांजाविक्री आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री होत असल्याचे पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे स्पष्ट झाले. तरीही अद्याप काही ठिकाणी अमली पदार्थ आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची व इंजेक्शनची विक्री होते आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दर आठवड्याला आढावा घेऊनही या अवैध व्यवसायांना प्रतिबंध करण्यात यश आलेले नाही. या व्यवसायातून गुन्हेगारी वाढली असून काही अल्पवयीन मुलेही नशेच्या आहारी जात आहेत.