राहाता : शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रारूप मतदारयाद्यांमधील त्रुटींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. याद्यांमध्ये हेतुपुरस्सर घोळ घातल्याचा गंभीर आरोप शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी करीत जोपर्यंत याद्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी ही माहिती दिली. यावेळी शिर्डीचे उपशहराध्यक्ष वकील अविनाश शेजवळ, शिर्डी शहर युवक काँग्रेसचे अमृत गायके, चंद्रकांत जाधव, मीरा साना, कमलेश जाधव, तुषार शेजवळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
चौगुले यांनी सांगितले की, प्रभागातील कुटुंबाचे घर एकीकडे तर कुटुंबातील व्यक्तींचे नाव दुसरीकडे, विधानसभेला मतदान केलेल्या नागरिकांची मतदारयादीतून गायब झाली आहेत. तर नावेच दोन वेगवेगळ्या प्रभागांत एकाच मतदाराचे नाव आले आहे. ही चूक नाही, तर निवडणूक निर्णय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या तालावर काम करत असल्याने रचलेले कटकारस्थान आहे. या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देत जोपर्यंत मतदारांची नावे दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत आम्ही कोणत्याही निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाणार नसल्याचे चौगुले यांनी सांगितले.
शिर्डी शहरातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ असून, अनेक मतदारांची नावे दुबार झाली आहे. काहींची नावे वेगवेगळ्या विभागांमध्ये गेलेली असून, त्यामुळे मतदारांचा मोठा गोंधळ उडालेला आहे. हरकती घेण्यास फारसा कालावधी देखील नाही. त्यामुळे वेळप्रसंगी यासाठी जे दोषी असतील त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार असून, पक्षांच्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन न्यायालयीन लढा देखील देऊ, असा इशारा चौगुले यांनी देत विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात देखील मतदारांच्या बाबतीत असलेल्या गोंधळाबाबत आपण त्यावेळी देखील भूमिका जाहीर केली होती, तीच परिस्थिती आता शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत देखील दिसून येत असल्याचे चौगुले म्हणाले.
निवडणुकीसाठी विधानसभेची मतदारयादी वापरली जाते. त्याबाबत कुणाच्या हरकती-सूचना असतील, तर त्या नोंदविण्यासाठी नगरपरिषदेने वेबसाइटवर व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन आवाहन केलेले आहे.- सतीश दिघे, शिर्डी, नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक