मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती : विमानतळाच्या विस्तारीकरणाचे पूर्ण होत आलेले काम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीला मिळालेली गती, नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत वस्त्रोद्योगांना चालना, राष्ट्रीय महामार्गाची कामे या सकारात्मक गोष्टी ही जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील जमेची बाब मानली जाईल.  सुपीक जमीन, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि सातपुडयाच्या डोंगररांगा, देश-विदेशात मागणी असलेल्या संत्र्याचे उत्पादन, या पूरक बाबी असूनही सिंचनाच्या बाबतीत पिछाडीवर असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेले हे बदल ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’मध्ये कसे उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नांदगावपेठच्या औद्योगिक वसाहतीत २०११-१२ मध्ये  विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) रद्द झाल्याने औद्योगिक क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. ते मळभ दूर होऊन गेल्या काही वर्षांत १३ मोठे उद्योग या ठिकाणी स्थापन झाले.  रेमंड, सियाराम सिल्क, सूर्यलक्ष्मी कॉटन मिल्स, गोल्डन फायबर यांसारखे नामांकित उद्योग येथे आले असून रोजगारनिर्मितीला हातभार लावत आहेत, हा मोठा सकारात्मक बदल दिसून आला आहे. देशातील वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सात राज्यांत पंतप्रधान मित्र – महावस्त्रोद्योग केंद्र (मेगा टेक्सटाईल पार्क) उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात अमरावतीचा समावेश असून त्याद्वारे दहा हजार कोटींच्या गुंतवणुकीसह ३ लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. या उद्यानामधून कपडयांच्या निर्मितीपासून त्यांचे मार्केटिंग, डिझायनिंग आणि निर्यातीपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणाहून करणे शक्य होणार आहे. 

हेही वाचा >>> शरद पवार पक्षाचे सदस्य नसताना अध्यक्षपदी कसे? अजित पवार गटाच्या वकिलांचा युक्तिवाद; विधानसभा अध्यक्षांपुढे आमदार अपात्रतेबाबत सुनावणी

मोर्शी तालुक्यातील उमरखेड आणि चांदूर बाजार तालुक्यातील मासोद या ठिकाणी ‘सिट्रस इस्टेट’ उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च प्रतीची कलमे पुरविण्यापासून संत्र्याची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय अमरावती जिल्ह्यात २ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. यामुळे संत्री उत्पादकांना योग्य भाव मिळून योग्य प्रतीची संत्री देशात आणि परदेशात पाठवणे सुलभ होणार आहे. जिल्ह्यात पशुपालन, दुग्धव्यवसाय, रेशीमउद्योग, कुटीरोद्योग अशा व्यवसायाच्या माध्यमातूनच उद्यमशीलता रुजू शकते. सर्वांगीण विकास घडवून आणायचा असेल तर कृषिकेंद्रित उद्योग -व्यवसायाशिवाय पर्याय नाही.

रस्त्यांची सुधारणा

महाराष्ट्रातील नंदूरबार ते भंडारा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील अमरावती ते चिखली महामार्गाच्या विस्तारीकरणाचे अनेक वर्षे रखडलेले काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्त्यांची सुधारणा झाली आहे. राज्याची स्थापना झाली त्या वेळी जिल्ह्यात केवळ १,२२५ किलोमीटरचे रस्ते होते. ही लांबी आता ८ हजार ४१२ किलोमीटर्रयत पोहोचली. पंतप्रधान ग्राम सडक योजनेत साडेसहाशे किलोमीटरचे रस्ते उभारले गेले. राष्ट्रीय महामार्गावर शहरात रहाटगाव येथील वाय जंक्शनवरील उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. दुसरीकडे, मोझरी येथे सहा किलोमीटरचा वळणमार्ग उभारला जातोय. ही भौतिक प्रगती रस्तेविकासाची साक्ष देणारी ठरेल.

शक्तिस्थळे

* २ ठिकाणी आधुनिक संत्री प्रक्रिया केंद्रे

* अमरावती ते चिखली महामार्ग पूर्ण

* मेगा टेक्सटाइल पार्क

संधी

* विमानतळ विस्तारीकरणाला गती

* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नवीन वर्षांत

त्रुटी

* ७.८२ लाख हेक्टरपैकी २.४१ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

* मेळघाटमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता

धोके * मेळघाटातील बालमृत्यू दर ३८वर