अहिल्यानगर: जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना ‘जाणता राजां’नी केल्या. कुकडी कालव्याच्या कामांना त्यांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही. जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले, निधीसाठी मात्र मागे हटले, अशी घणाघाती टीका जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली. पारनेर तालुक्यातील ४९ गावांच्या ६ उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कुकडी कालव्याच्या कामांची सुरुवात पारनेरमध्ये मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. महायुती सरकारने एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यातील १ ते ६० किमीच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती देताना त्यांनी वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

या वेळी आमदार काशिनाथ दाते, आमदार शरद सोनवणे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे, विजय औटी, सचिन वराळ आदी उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, की १९८२ पासून या कालव्यांना निधी मिळाला नाही. अनेकांनी इथे येऊन फक्त भाषण केले. कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे. १८०० क्युसेकने वाहणारा कालवा आज १४०० क्युसेकवर आला. शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेल, तर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. अनेक वर्षे पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले. पाणी असेल तर विकास आहे. रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली. कामगार देशोधडीला कोणी लावले. मुंबईत बसून कारखाने चालतात का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आ. काशिनाथ दाते यांनी ही सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली, तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. आमदार शरद सोनवणे यांनी, आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून जलसंपदाच्या माध्यमातून विखे यांचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.