नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघांच्याही सभा एकाच मदानावर झाल्या. मात्र, सभेस मिळालेल्या प्रतिसादावरून मतदारसंघात जय-पराजयाची चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधींच्या सभेने काँग्रेसने ‘हात’ दाखवून अवलक्षण केल्याची चर्चा होत आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने मतदारसंघात अतिशय नियोजनबद्ध प्रचार सुरू केला. एकाच वेळी अनेक ठिकाणी सभा घेण्याचे कौशल्य काँग्रेसला अवगत असल्याने प्रचारात काँग्रेस आघाडीवर होती. दुसरीकडे भाजपचे ढिसाळ नियोजन असल्याने प्रचारात त्यांची गती प्रारंभी कासवाला लाजवणारी होती. परंतु नरेंद्र मोदींची क्रीडासंकुलावर एकच सभा झाली आणि या सभेने सारा नूरच पालटून टाकला. भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोदींच्या सभेने आत्मविश्वास वाढवला. खेडोपाडी मोदींची हवा पसरली. ‘पीक जोमात आहे. पण राशीची तयारी कशी केली जाते किंवा ऐनवेळी दुसऱ्यानेच कणसे खुडून नेली असे होणार नाही, हे भाजपने लक्षात ठेवायला हवे. काँग्रेसचे लक्ष मात्र ‘भरात आलेल्या कणसावर’ आहे.
मोदींच्या सभेला प्रत्युत्तर कसे द्यायचे? यावर काँग्रेसची मंडळी चिंताक्रांत होती. मोठय़ा धाडसाने क्रीडासंकुलाच्या मदानावर राहुल गांधींची सभा घेण्यात आली. मोदींच्या गुजरात मॉडेलचा राहुल गांधींनी भाषणात खरपूस समाचार घेतला; पण लोकांमध्ये वैचारिक भूमिकेपेक्षा सभेच्या गर्दीची तुलना सुरू झाली. राहुल गांधींच्या सभेला मोदींच्या सभेच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही गर्दी कमी होती, हे लोकांना कळावे या साठी वॉटस्अपवर दोन्ही सभांच्या गर्दीचे फोटो टाकले जात आहेत.
राहुल गांधींच्या सभेस लोक कमी येतील, त्यामुळे मदानावर संख्या कमी दिसू नये, या साठी आयोजकांनी १० हजार खुच्र्या ठेवून मोदींपेक्षा गर्दी कमी राहणार हे गृहीत धरले होते. तरीही राहुल गांधींची सभा घेऊन काँग्रेसने चूक केली, अशी चर्चा या पक्षातच होत आहे. उलट ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवण्याची संधी काँग्रेसने गमावली. शिवाय कल्पना गिरी हत्येप्रकरणासंबंधी चर्चा होणार, हे गृहीतच होते. राहुल गांधी हे गिरी कुटुंबीयांच्या घरी जाणार, अशी चर्चा एक दिवस अगोदरच सुरू झाली होती. पण तसे घडले नाही व सभेत हा विषय चर्चिलाही गेला नाही, त्यामुळे गिरी कुटुंबीयांनी गांधींचा निषेध केला. या प्रकरणाचा मतदानावर किती परिणाम होईल, यापेक्षा नव्या वादाला आणखी एक संधी काँग्रेसने दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.