Rahul Solapurkar Viral Video : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य असलेला अभिनेता राहुल सोलापूरकरांचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य असलेला व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडिवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून राहुल सोलापूरकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून माफी मागितली आहे. सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल सोलापूरकर म्हणाले, “मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर. मी पुन्हा वेगळ्या कारणाकरता तुमच्याशी संपर्क साधतोय. दोन स्पष्टकीरणं देणं मला महत्त्वाचं वाटलं. माझ्या एका २३ नोव्हेंबरच्या पॉडकास्टमधील दोन ओळी व्हायरल करून मध्यंतरी गदारोळ करण्यात आला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटताना प्रसंगाविषयी बोलताना माझ्याकडून एक चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात गेला होता, त्यामुळे अनेकांच्या भावनांना ठेच लागली. याबद्दल मी जाहीर माफीही मागितली. मला तो शब्द असा विषय नव्हता तर महाराजांच्या राजनीतीविषयी बोलायचं. महाराजांनी सुटका कशी करून घेतली, हा विषय बोलायचा होता, पण लाच हा शब्द बोललो आणि अनेकांच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल मी आजही माफी मागतो.”

त्या मुलाखतीतील दोन वाक्य काढून मनं कलुषित करण्याचा प्रयत्न होतोय

“आज पुन्हा नवा विषय समोर आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी. छत्रपती शाहू महाराजांची भूमिका करताना त्यात एक विषय होता. कोण कोणत्या घरात जन्माला आलाय यावरून त्याची जात ठरत नाही, तर तो काय कर्म करतोय याच्यावर जात ठरते. त्याचा उल्लेख त्या मुलाखतीत करताना मी म्हटलं होतं की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्याने ते क्षत्रिय ठरतात. या न्यायाने मी म्हटलं होतं की रामजी सकपाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात. हे वेदांमधलं चातुवर्णीय वितरण आहे, त्याविषयी मी बोललो होतो. पण त्या मुलाखतीतील दोन वाक्य काढून मनं कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय”, असं राहुल सोलापूरकर म्हणाले.

“गेली ४० वर्षे वावरत असताना डॉ. बाहासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर इ अनेक विषयांवर मी जगभर व्याख्याने देतो, या सर्वांपुढे नतमस्तक होऊन व्याख्याने देतो. ज्यांनी माझी व्याख्याने ऐकली आहेत, त्या सर्वांना माहितेय. पण तरीही असं का केलं जातंय, याविषयी मी अनभिज्ञ आहे. ज्या ज्या महामानवांना समोर ठेवून मी जगत असतो त्यांच्याविषयी वाईट वक्तव्य माझ्याकडून होणार नाही. आणि ज्यांना वाटतं माझ्याकडून झालं आहे, त्यांची मी माफी मागतो”, असं म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul solapurkar viral video of dr babasaheb ambedkar controversial statement sgk