अलिबाग- आमदार महेंद्र थोरवे यांच्या निकटवर्तीयांकडून एका वाहन चालकाला मारहाण केली जात असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ही चित्रफीत एक्स अकाऊंटवर अपलोड करत मिंधे राजवट फक्त गुंडासाठीच असे म्हणत शिवेसना शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे. मात्र या आरोपांचे आमदार थोरवे यांनी खंडन केले आहे. मारहाण करणारा आपला सुरक्षा रक्षक नसल्याचे तर ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. वर्दळ असलेल्या रस्त्यावर एका व्यक्तीने लाकडी दांडका घेऊन एका वाहन चालकाला जबर मारहाण केली होती. या घटनेची चित्रफीत बुधवारी समाज माध्यमांवर प्रसारित झाली. ही चित्रफीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक्स या समाज माध्यमावर प्रसारित केली. आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षा रक्षक की गुंड ? असा सवाल या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. शिंदे गटाची राजवट गुंडासाठीच अशी टीकाही या पोस्टमधून करण्यात आली.

हेही वाचा – सातारा : ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या २९ गणेश मंडळांवर खटले

हेही वाचा – Sanket Bawankule Nagpur Accident: ‘अपघातानंतर संकेत बावनकुळेला प्रत्यक्षदर्शींनी चोप दिला’, सुषमा अंधारेंनी केले अनेक धक्कादायक आरोप

मात्र ही चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आमदार थोरवे यांनी याबाबतच खुलासा केला आहे. या घटनेशी माझा कुठलाही संबध नाही. चित्रफीतीत मारहाण करणारा तरुण हा आपला सुरक्षा रक्षक नाही. दोन्ही कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत. उलट मारहाण झालेली व्यक्ती माझ्या नातेसंबधातील आहे. पण शिवसेनेच्या ठाकरेगटाकडून या घटनेतून माझ्या बदनामीचा डाव असल्याचे स्पष्टीकरण आमदार थोरवे यांनी दिले.

दरम्यान याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिवाजी गोविंद सोनवळे वय-35 वर्ष रा.पिंपळोली ता.कर्जत याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. गाडीची काच फुटण्यावरून झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याच पोलीस तपासात समोर आले आहे.