अलिबाग – रायगड जिल्ह्यातील ६४ हजार २२९ शेतकऱ्यांनी यंदा पिक विम्यासाठी नोंदणी केली आहे. राज्यसरकारने यंदा १ रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई देताना होणारी अडवणूक, पिक विम्याच्या लाभासाठीचे जाचक नियम, आणि राज्यातील इतर भागांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात असलेले पिक विमा हप्त्याचे चढे दर यास कारणीभूत ठरत होते. पण यंदाचे वर्ष याला अपवाद ठरले आहे.

हेही वाचा – शाळांमध्ये आता शिक्षणासोबतच निसर्गाशी जवळीक साधण्याचीही संधी; जिल्‍हा परिषदांच्या शाळांमध्‍ये फुलणार परसबाग

जिल्ह्यातील तब्बल ६४ हजार २२९ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. अतिवृष्टी, पूर, भुस्खलन, हवामानातील सतत होणारे बदल आणि पावसाची अनियमितता या कारणामुळे शेतीचे नुकसान होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले होते. अशा परिस्थितीत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचा हात अपुरा पडत होता. ही बाब लक्षात घेऊन राज्यसरकारने यंदाच्या वर्षीपासून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. ज्यामुळे शेतमलाला अत्यल्प दरात पिक विम्याचे संरक्षण मिळणार आहे. यामुळेच शेतकऱ्यांचा पिक विमा घेण्याकडे कल वाढला आहे.

पीक विमा काढण्यात रायगड विभाग राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ८१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या नियोजनबद्ध कामामुळे जिल्ह्यात पीक विमा मोठ्या प्रमाणात काढण्यात यश आले आहे. शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने यंदा फक्त एक रुपयात पीक विमा जाहीर केला होता. उर्वरित विम्याची रक्कम शासन भरणार आहे.

रायगड जिल्ह्यात गत वर्षी २०२२ साली फक्त ७ हजार ८९० शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना विम्याची पूर्ण रक्कम भरावी लागली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवली होती. यंदा फक्त एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळणार आहे. रायगड जिल्ह्यात चोला मंडळ विमा कंपनीद्वारे पीक विमा दिला जाणार आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पीक विमाबाबत आवाहन करून ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे ६४ हजार २२९ शेतकऱ्यांनी शासनाच्या या पीकविमा योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

पिक विमा योजनेची सद्यस्थिती

जिल्ह्यात खरीप २०२३ मध्ये कर्जदार शेतकरी १४ हजार ४२६, बिगर कर्जदार शेतकरी संख्या ४९ हजार ८०३ असे एकूण ६४ हजार २२९ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत. जिल्ह्यातील २७ हजार १५५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. १३९ कोटी विमा रक्कम झाली असून शेतकऱ्याचे एक रुपयाप्रमाणे ६४ हजार २२७ रुपये जमा झाले आहेत.

हेही वाचा – “नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे हसन मुश्रीफ…”, संजय राऊतांचा टोला

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा घ्यावा यासाठी कृषी विभागाने यंदा विशेष महेनत घेतली. कृषी विभागाच्या अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी गावोगाव सी एस सी केंद्र चालकाच्या मदतीने शिबिरे आयोजित केली. शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी कृषी विभागाने स्वत: मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदणी करून घेतली. विमा कंपनीकडेही सतत पाठपुरावा केला. बँकेसोबत वेळोवेळी बैठका घेऊन कर्जदार, आदिवासी शेतकऱ्याची पीकविमा नोंदणी करून घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. – उज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधिकारी