अलिबाग : गुगल प्ले वरून ऑनलाइन गेमिंग ॲप डाऊनलोड करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे… या ऑनलाईन गेमिंग ॲप च्या माध्यमातून जुगार चालवले जात असल्याची बाब समोर आली आहे. ऑनलाइन गेमिंग च्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे.भारतात ऑनलाईन जुगाराला बंदी असतांनाही अँप्सच्या माध्यमातून जुगाराचे प्रकार राजसोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. रायगड पोलीसांच्या सायबर सेल विभागाने अशाच एका ऑनलाईन जुगाराचा उलगडा गेला आहे. राजस्थान मधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात कोट्यावधींचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे यात काही बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी व्यक्त केली आहे.

अलिबाग मधील नागडोंगरी येथे राहणाऱ्या अमित बापू जाधव यांना मोबाईलवर तीन चार महिन्यांपूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या अनेक जाहिराती येत होत्या, गुगल प्ले स्टोअरवर हे अँप उपलब्ध असल्याने त्यांनी यातील तीन अँप डाऊनलोड केले. यात एएम ९९९, परिमिच आणि मधूर मटका या तीन अँप्सचा समावेश होता. तिन्ही अँपसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी गुगल पे च्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग खेळण्यासाठी त्यांनी एएम ९९९ अँपच्या माध्यमातून वॅलेट ममध्ये गुगल पेच्या माध्यमातून दहा हजार रुपये जमा केले. मात्र यातून त्यांना कुठलाही परतावा आला नाही. आपती फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अलिबाग येथील सायबर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा यांच्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

देशात ऑनलाईन जुगाराला बंदी असल्याने, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ, आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तांत्रिक माहिती संकलित करून, तिन्ही अँपशी निगडीत असलेली ४४ बँक खाती आणि त्यामधील १९ कोटी ४४ लाख ३ हजार ४९३ रुपयांची रक्कम संबधित बँकाना सांगून गोठवली. एएम ९९९ गेमिंग अँपशी निगडीत एका आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. भारमल हुनुमान मिना असे त्याचे नाव असून, त्याला सवाई माधवपूर राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे. अन्य पाच आरोपींचा शोध सुरू आहे.

महत्वाची बाब म्हणजे अत्यंत सामान्य कुटूंबातील व्यक्तींच्या नावाने करंट अकाऊंट उघडून त्यामाध्यमातून साडेतीनशे कोटींहून अधिकचे व्यवहार होत असल्याची माहिती या प्रकरणाच्या तपासात समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे बँकांकडून करंट अकाऊंट उघडतांना संबधित व्यक्तीची आणि त्याच्या व्यवसायाची तपासणी करणे आवश्यक असते मात्र बँकांकडून अशी कुठलिही तपासणी झाल्याचे दिसून आलेले नाही. विशेष म्हणजे या खात्यामधून गेल्या काही महिन्यात साडे तिनशे कोटींहून अधिकचे व्यवहार झाले असतांना बँकांनी त्याबाबत कुठलिच पडताळणी केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात बँक अधिकारी आणि कर्मचारी यांचाही संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

दिवसाला लाखभर रुपयांचे कमिशन

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भारमल मिना आणि त्यांच्या घरातील इतर सदस्यांना या प्रकरणात दररोज एक लाख रुपयांचे कमिशन स्वरुपात मिळत असल्याचेही तपासात समोर आले आहे. तर इतर फरार आरोपींच्या खात्यांमधून करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासात ईडीचीही मदत घेणार असल्याचे पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितले. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग अँप्स डाऊनलोड करतांना काळजी घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधण्याचे आवाहन दलाल यांनी केले आहे. या तपासात पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय मोहीते, पोलीस हवालदार राजीव झिंगुर्टे, सुचेता पाटील, पोलीस नाईक तुषार घरत समिर पाटील, पोलीस शिपाई श्रेयस गुरव यांनी महत्वाची भुमिका बजावली.