अहिल्यानगर : रेल्वे मंत्रालयाने राहुरी- शनिशिंगणापूर या ४९४.१३ कोटी रुपये खर्चाच्या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग आहे. केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी ही माहिती दिली.
शनिशिंगणापूर हे भाविकांची मोठी गर्दी असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सध्या येथे थेट रेल्वे सुविधा नसल्यामुळे यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागतो. नवीन रेल्वेमार्गामुळे या भाविकांसह राहुरी, नेवासा परिसरातील नागरिकांचीही सोय होणार आहे. तसेच शिर्डी, राहुरी, नेवासा परिसरातील धार्मिक पर्यटन स्थळांनाही चालना मिळणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या प्रकल्प अहवालानुसार रोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामुळे वार्षिक १८ लाख प्रवाशांना फायदा होईल, असाही दावा करण्यात आला आहे. या रेल्वेमार्गासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाठपुरावा केल्याचे डुंगरवाल यांनी सांगितले. शनिशिंगणापूर रेल्वेमार्गामुळे मार्गावर येणार असल्याने भाविकांबरोबरच पर्यटनालाही चालना मिळणार आहे. जिल्हा प्रवासी संघटनेचे हरजीतसिंग वधवा यांनी या नवीन रेल्वेमार्ग मंजुरीचे स्वागत करत पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.