कृष्णा-वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम असला तरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलक्या सरी तर पूर्व भागात बुधवारी विश्रांती घेतली. चांदोली व कण्हेर धरणातून सेकंदाला १८ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदी दुथडी भरून वाहात आहे. चांदोलीतील पाणीसाठा बुधवारी सकाळी ९२ टक्के झाला.
शिराळा तालुक्यात पावसाचा जोर काल रात्रीपासून ओसरला असला तरी चांदोलीतील पाण्याची पातळी सेकंदागणिक वाढत आहे. चांदोली धरणाच्या परिसरात आज सकाळी ८ वाजेपर्यंत ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठा ३१.५ टीएमसी झाला असून ९२ टक्के धरण भरले आहे. कोयना धरणात ८३.२२, धोम ११.१८, कण्हेर ९.२२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाच्या सांगली कार्यालयातून सांगण्यात आले.
चांदोली धरणातून १० हजार ६८८ आणि कण्हेर धरणातून ८ हजार ३४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने कृष्णा, वारणा नद्या दुथडी भरून वाहात आहेत. कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१८.३० मीटर झाली असून १०२.११  टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची उच्चतम पाणीपातळी ५१९.६० मीटर असून ८१.६८ टक्के धरण भरले आहे. या धरणात दरसेकंदाला १ लाख २३ हजार क्युसेक्स पाण्याची आवक असताना प्रत्यक्षात १ लाख ३१ हजार ७२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात आज सकाळपर्यंत ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्याच्या ठिकाणी आज सकाळी नोंदला गेलेला पाउस इस्लामपूर ३, पलूस १, सांगली १०, मिरज ९, विटा ५, कवठेमहांकाळ १.५, कडेगाव ८ मिलिमीटर. जत, आटपाडी या ठिकाणी सकाळपर्यंत पावसाची काहीही नोंद झाली नाही.
 
 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall in the catchment area of the krishna varna