फडणवीसांनी उपमुख्यंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंचं पत्र; म्हणाले “ही बढती आहे की…”

“वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल”

फडणवीसांनी उपमुख्यंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंचं पत्र; म्हणाले “ही बढती आहे की…”
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलेलं असतानाच राज यांनी त्यांचं कौतुक केलंय. राज ठाकरेंनी फडणवीसांसाठी एक विशेष पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे. खास बाब म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन भाजपावर टीका केलेली असतानाच राज यांनी याच्या अगदी विरुद्ध भूमिका घेत पक्षाच्या निर्णयाप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक केलंय.

नक्की वाचा >> मोदींचा फोन, फडणवीस अन् उपमुख्यमंत्रीपद; शपथविधीच्या काही मिनिटं आधी नेमकं घडलं काय?

“सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…” असं म्हणत राज यांनी पत्राची सुरुवात केली आहे.

पुढे राज लिहितात, “तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं अशूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारु, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपम-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत.”

नक्की वाचा >> “आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे…” शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट

फडणवीसांचा आदर्श सर्वांनी समोर ठेवला पाहिजे असंही राज यांनी या पत्रात म्हटलंय. “पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन!,” असं राज पत्रात म्हणतात.

नक्की वाचा >> “BJP आणि RSS ला विचारलं पाहिजे, फडणवीसांचा अपमान करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलंय का?”

‘आता जरा आपल्यासाठी’ असं म्हणत पत्राच्या मध्यापासून राज यांनी एका रुपकामधून फडणवीसांचा हा निर्णय माघार नसल्याचं म्हटलंय. “ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे,” असं राज म्हणालेत.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२”

पत्राच्या शेवटी राज यांनी, “एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!” असं म्हणत फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात.

राज यांनी सोशल मीडियावरुन हे पत्र शेअर केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray letter to devendra fadnavis as he swore in as deputy cm of maharashtra scsg

Next Story
शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यावरुन महाराष्ट्रात कधी परतणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “सर्व आमदार…”
फोटो गॅलरी