गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कुणीतरी घडवत असल्याची शंका व्यक्त आहे. आपल्याला वाटतं आपण जातीसाठी काहीतरी करत आहोत. पण, हे कुणीतरी चालवत आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं. ते पिंपरी-चिंचवडमध्ये १०० व्या मराठी नाट्यसंमेलनात बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “राजकारण, समाजकारण, संस्था आणि चळवळी या गोष्टी मध्यमवर्गीयांच्या हातात होत्या. श्रीमंत आणि गरींबामध्ये मध्यमवर्ग हा दुवा होता. पण, १९९५ नंतर उतरती कळा लागली. १९९५-९६ साली मोबाईल, इंटरनेट, टेलिव्हिजन चॅनेल्स आले. सर्वात जास्त ८२ कोटी वापरकर्ते मोबाईल फोनवर असून देश व्हेंटिलेटवर आहे.”
हेही वाचा : “…म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार नाही”, नाट्यसंमेलनात राज ठाकरेंकडून ‘त्या’ कलाकारांची कानउघडणी
“महाराष्ट्रानं देशाचं प्रबोधन घडवलं आहे”
“तुम्ही कुठल्या पक्षाला मतदान करता आणि पाठिंबा देता, याच्याशी मला देणंघेणं नाही. पण, महाराष्ट्रातील मध्यमवर्गानं राजकारण, समाजकारण, संस्थामध्ये आलं पाहिजे. महाराष्ट्राला सुज्ञ लोकांची गरज आहे. कारण, महाराष्ट्र हा दिशादर्शक आहे. महाराष्ट्रानं देशाचं प्रबोधन घडवलं आहे. आज तोच महाराष्ट्र सर्व ठिकाणी चाचपडत आहे. ही धोक्याचं घंटा आहे,” अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.
“महाराष्ट्राचं एकत्रीकरण विखरून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू”
“महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कुणीतरी घडवत आहे. हे आपल्या लोकांना समजत नाही. महाराष्ट्र एकसंघ राहू नये, म्हणून सगळे प्रयत्न करत आहेत. आम्ही गाफील आहोत. ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे. आपल्याला वाटतं आपण जातीसाठी काहीतरी करत आहोत. पण, हे कुणीतरी चालवत आहे. यासाठी काही चॅनेल्स, सोशल मीडिया, काही नेते, पक्ष काम करत आहेत. महाराष्ट्राचं एकत्रीकरण विखरून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा : “…तर मी शरद पवारांना वाकून नमस्कार करेन”; राज ठाकरे यांचं वक्तव्य चर्चेत
“सगळ्या गोष्टीत महाराष्ट्र पुढारलेला आहे”
“राज्यातील नेते त्यांच्या सत्तेत मशगूल आहेत. महाराष्ट्राचा विचार करण्यास कुणी तयार नाही. कधीतरी महाराष्ट्राची पुस्तकं काढून वाचा, मग कळेल आपली ताकद काय होती. सगळ्या गोष्टीत महाराष्ट्र पुढारलेला आहे,” असंही राज ठाकरे म्हणाले.