आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट वाचवून दाखवावे, असे आवाहन देणाऱ्या उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हिंमत असेल तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. नंतर डिपॉझिट दीपक केसरकर यांचे जाते की नारायण राणे यांचे ते समजेल, असे जाहीर आव्हान शिवसेना महायुतीचे लोकसभा उमेदवार सचिव आमदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिले. आ. दीपक केसरकर यांनी दाखविलेल्या दिलदार व दानशूरपणाचा शिवसेना पक्षप्रमुख नक्कीच आदर करतील असेही ते म्हणाले.
 आ. विनायक राऊत सावंतवाडीत पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी, सहसंपर्क प्रमुख भाई देऊलकर, शहरप्रमुख शब्बीर मणीयार, शैलेश तावडे, विलास सावंत, विनोद काजरेकर, चंद्रकांत कासार व पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा मतदारसंघात बॅ. नाथ पै यांच्या विचारांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. हैदोस, अत्याचार, लूटमार करणाऱ्यांचा हा जिल्हा नव्हे, हे जनता दाखवून देईल. आम्ही जनतेला अपेक्षित काम करणार आहोत असे राऊत यांनी सांगितले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी निवडणुकीत उभे राहून आमदार दीपक केसरकर यांच्यासमोर डिपॉझिट वाचवून दाखवावे असे जाहीर आव्हान आ. राऊत यांनी दिले आहे. राणेंच्या दोन्ही मुलांना मिसरूडही फुटले नाही. त्यांच्यासाठी माझे एम.ए.चे सर्टिफिकेट व मार्कलिस्ट निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे असेही  राऊत म्हणाले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आलेला होता. त्यामुळे आ. दीपक केसरकर यांचा निर्णय अंतिम असेल. पण त्यांनी दाखविलेले औदार्य, दानशूरपणा व दिलदारपणाचा आदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलेला आहे. महायुतीचे सर्वच नेते त्यागी आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील जनतेचा निर्णय राज्याला धक्कादायक वाटेल असे चमत्कार घडविणारे लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे आमच्या स्वार्थासाठी कोणाचा राजकीय बळी देणार नाही. आ. दीपक केसरकर, पुष्पसेन सावंत, बाळ भिसे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मालवणी बाणा कौतुकास्पद आहे.
 चिंतामण देशमुख यांचा बाणेदारपणा वाचला होता, पण आ. दीपक केसरकर यांचा बाणेदारपणा प्रत्यक्ष पाहिला असे सांगत राऊत यांनी हा विजय लोकभावनेचा असेल असे स्पष्ट केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पाणीटंचाईची भीषणता जाणवत आहे. गतवर्षी सिंधुदुर्गात शिवसेनेने टँकरने पाणीपुरवठा केला होता. आता आचारसंहिता असल्याने परवानगी मिळाल्यास टँकरने पाणीपुरवठा व बोअरवेल देण्याचा विचार करू असे राऊत म्हणाले.
हत्ती, गवारेडे, रानगाई अशा सर्व वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांना वाचवा अशी भूमिका शिवसेना-भाजप महायुती सरकारकडे घेईल असा विश्वास आ. राऊत यांनी व्यक्त केला. माणगाव खोऱ्यात संध्याकाळी ६ वाजल्यानंतर लोक घराबाहेर पडत नाहीत. शेती व बागायतीच्या नुकसानीमुळे लोक शेतीच करत नाहीत.
कामधंदे सोडून हत्तींना पळविण्यासाठी लोकांना पुढाकार घ्यावा लागत आहे. मशाली करण्यासाठी रॉकेल कोठून आणणार आणि मिरची पूड कोणाला परवडणार असा सवाल करत हत्तींना परत पाठवा अशी भूमिका घेणार आहोत असेही राऊत यांनी सांगितले.
हत्तीत मृत्युमुखी व जखमीच्या वारसांना नोकरी द्या, माणगाव खोरे वाचवा अशी भूमिका आपली असून अभयारण्य नको, हत्ती हटवा. शासकीय प्रतिबंधक तकलादू निर्णय नको अशी भूमिका घेणार आहोत असे राऊत म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक कालावधीतील व्यवहाराची चौकशीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. राजन तेलीच्या काळातील व्यवहाराची चौकशी करून बँकेचे कार्यकारी मंडळ बरखास्त केले जावे असे राऊत म्हणाले.