राहाता : अनेक अडचणी व राजकीय संघर्षाला तोंड देत, त्यावर मात करून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के यांनी श्रीरामपूर दूध जिल्हा संघाचा यशस्वी कारभार केला. परंतु, १९९५ साली राज्यात बदललेल्या राजकारणामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. त्याविरोधात त्यांनी सक्षमपणे लढा देत राजकीय संघर्षावर मात करीत जिवाभावाचे कार्यकर्ते कमवले, असे प्रतिपादन काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा व नाथाजी म्हस्के यांचा पुतळा अनावरण समारंभ आज, रविवारी बाभळेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून थोरात बोलत होते.

खासदार नीलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, मीनाताई जगधने, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार दादा कळमकर व भानुदास मुरकुटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, राजेंद्र फाळके, अरुण कडू, जि. प. च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे आदी उपस्थित होते.

सत्कारला उत्तर देताना रावसाहेब म्हस्के यांनी शालेय, सामाजिक व राजकीय जीवनात आलेल्या संघर्षाचा पट उलगडतांना ते भावुक झाल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले. म्हस्के यांनी सांगितले की, शंकरराव काळे व अण्णासाहेब शिंदे यांच्यामुळेच आपल्या राजकीय जीवन प्रवासाला सुरुवात झाली. दूधसंघाचा कारभार करताना अनेक संघर्षाला तोडीसतोड उत्तर देत कार्यकर्त्यांच्या जीवावर दुग्धव्यवसायाला ऊर्जितावस्था आणली. शरद पवार यांनी आमच्या प्रवरा शेतकरी मंडळाला पूर्णपणे ताकद दिली. आम्ही केवळ न्यायालयाच्या आदेशानेच यशस्वी झालो. मला राजकीय अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाला. अरुण कडू यांनी प्रास्ताविक केले. दादा कळमकर यांनी स्वागत केले.

शरद पवार यांची अनुपस्थिती

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधताना सांगितले की, रावसाहेब म्हस्के यांनी जिल्ह्याच्या नाहीतर राज्याच्या उभारणीत मोठे काम केले आहे. काम करणारा माणूस म्हणून गेल्या ४७ वर्षांपासून म्हस्के व आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत. ते पुढेही टिकतील. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येणार होते, काही कारणास्तव ते येऊ न शकल्याबद्दल सुळे यांनी दिलगिरी व्यक्त केली.