सोलापूर : महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे येत्या १७ जुलै रोजी सोलापुरात येत आहेत.

तत्पूर्वी, सरसंघचालक भागवत हे शेजारच्या विजयपूर जिल्ह्यातील निंबाळ येथे गुरुदेव रानडे आश्रमात दोन दिवस साधना करणार आहेत. गुरुदेव रानडे आश्रमात भागवत गेल्या अनेक वर्षांपासून साधनेसाठी येतात. यानिमित्त त्यांची सोलापूर भेट होते.

२५ वर्षांपूर्वी सोलापुरात संघ प्रचारक भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या आशीर्वादाने उद्योगवर्धिनी संस्थेचे रोपटे लावण्यात आले होते. यंदा संस्थेचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. त्याचे औचित्य साधून हुतात्मा स्मृतिमंदिरात सरसंघचालक भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका शंभूसिंग चौहान यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.