राजापूर: राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता केली. त्यातून, या शिवकालीन पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवीचे मंदीर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा सुमारे दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी शिवकालीन ऐतिहासिक ठेवा दृष्टिक्षेपात आल्याने येथील शिवकालीन इतिहास आता पुन्हा उलगडण्यास मदत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येरडव ते अणुस्कुरा शिवकाळामध्ये रहदारी असलेली आणि सद्यस्थितीमध्ये बंद होऊन दुर्लक्षित राहिलेल्या या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणामध्ये आल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आलेले मोघली सैन्यही या पायवाटेने कोकणात खाली उतरल्याचे सांगितले जाते. या पायवाटेवरील चेक नाकाच्या खाणाखुणा पाहता या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूकही झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. एकंदरीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या पायवाटेवरील आणि अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर असलेला हा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा पाहताना या ठिकाणावरून कोकण परिसर, अर्जुना धरणप्रकल्प अन् निसर्गसौदर्य अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार असल्याने भविष्यामध्ये शिवप्रेमी, पर्यटकांसह हौशी ट्रेकर्सची पाऊले या परिसराकडे वळल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

हेही वाचा – अंतर्गत वादामुळे रत्नागिरीत मनसे फुटली, उपजिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणार्‍या अनेक पायवाटा आहेत. मात्र, कालपरत्वे रहदारी कमी झाल्याने या पायवाटा दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यापैकी एक असलेली तालुक्यातील येरडव ते अणुस्कुरा ऐतिहासिक शिवकालीन पायवाट आहे. पाचल-येरडवमार्गे अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर जात मुख्य घाटमार्गाला जोडली जाणारी सुमारे तीन-चार किमी.च्या या पायवाटेचा प्रवासासाठी वाहने उपलब्ध नसलेल्या काळखंडामध्ये कोकणातून घाट परिसरामध्ये जा-ये करण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून उपयोग केला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अणुस्कूरा घाटमार्गाचे काम करताना अन्य पायवाटांप्रमाणे येरडव-अणुस्कूरा ही पायवाटही बंद झाली. मात्र, या शिवकालीन पायवाटेसह या मार्गावरील ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी शासनाने आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.

काय पाहता येईल येरडव-अणुस्कूरा या शिवकालीन पायवाटेवर

येरडव ते अणुस्कूरा या शिवकालीन पायवाटेवर अणुस्कूराच्या घाटमाथ्यावर असलेले श्री उगवाई देवीचे मंदीर, या मंदिरात असलेली श्री शंकराची पिंडी, ज्या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूक चालायची तो चेक नाका, अवखळपणे वाहणारा पाण्याचा झरा, एक व्यक्ती आत जाईल एवढी रुंद असलेली झर्‍याची येथील गुहा, ऐतिहासिक माहिती देणारा शिलालेख, येरवड येथील प्रसिद्ध श्री दत्तमंदीर.

हेही वाचा – Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी

“येरडव ते अणुस्कूरा ही शिवकालीन पायवाट आणि ऐतिहासिक ठेवा असलेला हा परिसर नैसर्गिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असून पर्यटकांसह शिवप्रेमींसह अभ्यासकांसाठी निश्‍चितच पर्वणी ठरणारा आहे. या शिवकालीन पायवाटेचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे असून आगामी काळात ग्रामस्थांच्या साथीने येरडवपर्यंत ही पायवाट दुरुस्त करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.” – प्रा. विकास पाटील, मनोहर हरी खापणे महाविद्यालय

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri a historical treasure of shivaji maharaj era found at raipatan in rajapur ssb