रत्नागिरी : राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षण मुद्द्यामुळे मनसेचे बडतर्फ नेते वैभव खेडेकर याचा गुरुवारी होणारा भाजपातील पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे. या पक्ष प्रवेशाची तारीख पुन्हा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झाल्यावर मनसेचे नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजपामध्ये प्रवेश करण्याचे निश्चीत झाले होते. मंत्री नीतेश राणे यांनी याविषयी अधिकृत घोषणा देखील पत्रकार परिषदेत केली होती. गुरुवार ४ सप्टेंबर रोजी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मात्र ऐनवेळी हा प्रवेश स्थगित करण्यात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वैभव खेडेकर यांनी भाजपात पक्ष प्रवेश करण्याचे निश्चीत केल्यावर या पक्ष प्रवेशाची संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता होती. मात्र ऐनवेळी हा पक्ष प्रवेश थांबविण्यात आल्याने आता हा पक्ष प्रवेश होणार की नाही याबाबत ही साशंकता निर्माण झाली आहे. खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा झाल्यावर खेडेकर यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. स्वतः वैभव खेडेकर यांनी गाडिवर पक्ष प्रवेशाचे बॅनर लावून आपली सज्जता दाखवून दिली होती. खेडेकर यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक या पक्षप्रवेशासाठी उत्सुक होते.
वैभव खेदेकर यांना भाजपाने पक्षात घेण्यासाठी तयारी दर्शवली होती, मात्र आता ऐनवेळी हा प्रवेश लांबणीवर पडल्याने विविध राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. ओबीसी आरक्षणाचे कारण पुढे केले जात असले तरी, यामागे काही अंतर्गत राजकीय समीकरणे आहेत का ? अशी चर्चा देखील जिह्यात सुरू झाली आहे. राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला असून तो चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या पक्षप्रवेश करणे योग्य नसल्याने हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून प्रवेशाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. – वैभव खेडेकर, मनसे बडतर्फ नेते.