Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून गेल्या महिन्यात राजकीय वातावरण तापलं होतं. केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने या जमिनीचा खरेदी व्यवहार केला होता. मात्र, वृत्तवाहिन्या व विरोधकांनी हे प्रकरण बाहेर काढून मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. त्यापाठोपाठ सदर जमीन वाचवण्यासाठी आंदोलनही झालं. अखेर धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र, या काळात शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं.
रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप केले होते, तसेच कथित पुरावे सादर करून, अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. दरम्यान, व्यवहार रद्द झाल्यानंतर हे प्रकरण शांत झालं. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी या घटनेचा उल्लेख करत एक्सवर एक पोस्ट केली आहे.
रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना चिमटा
खासदार मुरलीधर मोहोळ यांचा आज ५१ वा वाढदिवस असल्याने रवींद्र धंगेकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना मोहोळ यांना चिमटा काढला आहे. रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा उल्लेख केलेला नाही किंवा त्यांना टॅगही केलेलं नाही. मात्र, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “हॅपी बर्थडे बरं का…! वाढदिवसाच्या २३० कोटी शुभेच्छा..! जय जिनेंद्र.” जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा व्यवहार २३० कोटी रुपयांमध्ये होणार होता. त्याचाच उल्लेख करत धंगेकरांनी २३० कोटी शुभेच्छा असं म्हटलं आहे.
प्रवीण तरडेकडून मुरलीधर मोहोळांना शुभेच्छा
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्य सरकारमधील मंत्री, महायुतीमधील नेते व मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयांनी त्यांना समाजमाध्यमांवरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे याने देखील मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रवीण तरडेने फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की “मित्रा, पुण्यासाठी तू काम करत होतास , काम करतोयेस आणि काम करतच राहणार. कारण तू कार्यकर्ता आहेस, ते ही संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता. त्यामुळे संघर्ष जितका मोठा तू तितकाच त्वेषाने लढणार. तुझ्या प्रत्येक लढाईत कायम तुझ्यासोबत, वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा.”
