Red Soil Stories Shirish Gavas Died: कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या ‘रेड सॉईल स्टोरीज’ या चॅनेलचा निर्माता शिरीष गवसचा (वय ३३) दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच गवस दाम्पत्याने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडीओही रेड सॉइल स्टोरीजवर शेअर केलेला होता. या व्हिडीओखाली आता त्यांचे चाहते कमेंट करून दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत.

करोना काळात जेव्हा जग थांबले होते, तेव्हा मुंबईतील शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा गवस यांनी एक वेगळेच ध्येय उराशी बाळगले. शिरीष आयटी क्षेत्रात काम करायचा, पत्नी पूजा सिनेसृष्टीत काम करत होती. करोनामुळे ब्रेक लागल्यानंतर दोघांनीही सिंधुदुर्गातील आपल्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. गावातील जीवनशैली, तिथली खाद्यसंस्कृती, लोकांचे दैनंदिन जीवन, त्यात येणारी आव्हाने, गमतीजमती या सर्व घटना गवस दाम्पत्याने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या.

शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी करोनानंतर युट्यूबवर Red Soil Stories हे चॅनेल सुरू केले होते. सध्या त्यांच्या चॅनेलचे ४ लाख २७ हजार सबस्क्राइबर्स आहेत. गवस जोडप्याने आतापर्यंत या चॅनेलवर १६१ व्हिडीओ तयार करून अपलोड केलेले आहेत.

शिरीष गवसच्या मृत्यूबद्दल कोकणची लोकप्रिय इन्फ्लूएन्सर अंकिता प्रभूवालावलकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलेली आहे. “शिरीषच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसलाय. या बातमीवर विश्वासच बसत नाही”, अशी प्रतिक्रिया अंकिताने स्टेटसच्या माध्यमातून दिली. यानंतर तिने दुसरा एक स्टेटस शेअर करत आज (२ ऑगस्ट) शिरीष गवसवर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिली आहे.

अंकिता प्रभूवालावलकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी

नेमके काय झाले?

सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासोली येथे राहणारा शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूंशी निगडित आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती मिळत आहे. मात्र अखेर त्याचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

शिरीष गवसचे वडील हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार होते. एमबीएचे शिक्षण घेतलेला शिरीष गवस मुंबईत नामांकित कंपनीत कामाला होता. तर पत्नी पूजा गवस चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत होती. करोना नंतर ते गावी स्थायिक झाले आणि त्यांनी रेड सॉईल स्टोरीजसारखा अनोखा प्रयोग केला.

ऑक्टोबर २०२३ मध्ये शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी लोकसत्ताला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी या प्रवासाबद्दल माहिती दिली होती. रेड सॉईल स्टोरीज हे चॅनेल सुरू करण्याच्या आधीची परिस्थिती, हा निर्णय घेताना करावी लागलेली तडजोड, आर्थिक आव्हाने, त्यानंतर मिळालेले यश याबद्दल गवस जोडप्याने दिलखुलास गप्पा मारल्या होत्या.