रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येणा-या मी-या – नागपुर शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना बायपास रस्ता नसल्याने नागरिक व वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत. खोदलेल्या रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करीत वाट काढावी लागत आहे. आंबा घाट ते साखरपा नाणीज दरम्यान कामे अर्धवट स्थितीत असल्याने काही ठिकाणी दरडी कोसळून मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणा-या नागपुर गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम मागील एक वर्षा पासून सुरु आहे. हा महामार्ग मी-या – नागपुर शक्तीपीठ या नावाने रत्नागिरीला जोडण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली या ठिकाणी मुंबई – गोवा महामार्गाला जोडण्यात आला आहे.

जिल्ह्यातून जाणा-या या महामार्गाचे काम रवी इन्फ्रास्टक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. आंबा घाट ते पाली रत्नागिरी या मार्गावरील काही ठिकाणी या रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. मात्र या कंपनीने रस्ता पुर्ण करण्याबरोबर मार्गावर असलेल्या गावांना बायपास रस्त्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना वाहनांच्या वर्दळीतूनच मार्ग काढत रस्ता ओलांडून जावे लागत आहे.

या मार्गावरील साखरपा येथील बाजारपेठेत जाणा-या रस्त्याला बायपास रस्त्याची सुविधा नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येथील देवळे फाटा ते आंबा घाटाच्या पायथ्या पर्यत महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज पसरले आहे. तसेच खोदलेल्या रस्त्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्याचे काम थांबवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कामाचा वेग मंदावला आहे. तर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालकांना या ठिकाणाहून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. साखरपा तसेच नाणीज सारख्या महत्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी बायपास रस्त्याचे काम आधी पुर्ण करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

आंबा घाट ते पाली पर्यतचा संपुर्ण रस्ता घाट माथ्याचा असल्याने येथे दरडी कोसळण्याची भीती दाट आहे. गतवर्षी देवळे परिसरात झालेल्या चिखलामुळे प्रवाशांनी भरलेली बस दरीत जाता जाता थोडक्यात वाचली होती. या मार्गावरील घाटाच्या ठिकाणीच कामे अर्धवट झाल्याने अपघाताची शक्यता वर्तविली जावू लागली आहे. मी-या – नागपुर शक्तीपीठ महामार्ग लवकर पुर्ण करण्यासाठी शासन स्तरांवरुन प्रयत्न केले जात आहेत. मात्र या महामार्गाचे काम पुर्ण करण्याऐवजी टोल नाके उभारण्याची घाई केली जात असल्याचे दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणा-या या शक्तीपीठ महामार्गाची पावसाळ्यात झालेली दुरावस्था पाहता हे काम लवकरच पुर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

साखरपा येथे मोठी बाजार पेठ असताना येथील रस्त्याचे काम लवकर पुर्ण करणे गरजे असताना ते अर्धवट आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जीव मुठीत घेवून याठिकाणी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरच पुर्ण करावे… सचिन पाष्टे, ग्रामस्थ साखरपा,