Devendra Fadnavis : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच या अधिवेशनात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत या अधिवेशनात कोणते मोठे निर्णय घेण्यात आले? याची माहिती दिली आहे. जनसुरक्षा कायद्याला मंजुरी, मकोकामध्ये नार्कोटिक्सचा समावेश करण्याचा निर्णय आणि दिव्यांगांना आता १५०० ऐवजी २५०० रुपयांची मदत दिली जाणार यासह आदी मोठे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“जनसुरक्षा कायद्याबाबतच्या सर्व बैठका अतिशय चांगल्या पार पडल्या. समितीने देखील हा प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे विरोधकांनी देखील त्या कायद्याला सहकार्य केलं. मात्र, विरोधकांवर नंतर दबाव आला. पण या कायद्यात कोणत्याही त्रुटी विरोधक काढू शकणार नाहीत. जनसुरक्षा कायद्यात एका व्यक्तीला अटक करता येत नाही. जनसुरक्षा कायद्यासह आणखी काही महत्वाचे विधेयक देखील मंजूर करण्यात आले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचं विधेयक आपण तयार केलं आहे. हे प्राधिकरण पहिल्यांदाच आपण करत आहोत. तसेच गडचिरोलीमध्ये खाण प्राधिकरण विधेयक आपण मंजूर केलं आहे.आणखी एक महत्वाचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या पुढे मकोकामध्ये आता नार्कोटिक्सचाही समावेश करण्याचा निर्णय आपण घेतला आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे.

“तसेच पुरवणी मागण्याच्या माध्यमातून सर्वच गोष्टींना योग्य तो निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्य सरकारने दिव्यांगाकरीता आधी आपण १५०० रुपये मदत करायचो. पण आता आपण २५०० रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिक्षकांचं टप्पा अनुदान देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नव्या अनुकंपा धोरणाला मान्यता देण्यात आली. यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पण या अधिवेशनात काही गोष्टी घडल्या आहेत, त्याबाबत आम्हाला खेद आहे. मात्र, यापुढे अशा गोष्टी घडू नये यासाठी योग्य ते पावलं उचलले जातील. तसेच या अधिवेशनात विरोधकांनी हवेतले आरोप मोठ्या प्रमाणात केले. पुरावे न देता फक्त आरोप करण्यात आले”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.