छत्रपती संभाजीनगर – ग्रामजीवनाचा थोर बखरकार, ग्रामीण समाजमनाची स्पंदने संवेदनशीलपणे टिपणारा लेखक, सर्जनाचा मूल्यगर्भ आविष्कार म्हणून ज्यांच्या लेखन शैलीला गौरवण्यात ते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर तात्याबा चंदनशिव (यादव – वय ८०) यांचे रविवारी दुपारी लातूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कळंब (जि. धाराशिव) येथे अंतसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
प्रा. चंदनशिव यांना १६ सप्टेंबर रोजीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. प्रकृतीच्या कारणास्तव ते येऊ शकतात की नाही, असे सांगितले जात होते. परंतु प्रा. चंदनशिव यांनी पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी जांभुळढव्ह, रानसय या कथासंग्रहासह राज्य शासनाचे तीन पुरस्कार मिळाले होते. आचार्य अत्रे, आदर्श शिक्षक, दलितमित्र आदी पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले होते.
प्रा. चंदनशिव यांनी उस्मानाबादेत आयोजित २८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे, इस्लामपूर येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या पहिल्या ग्रामीण संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. मराठी साहित्य अकादमीचे, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. प्रा. चंदनशिव यांनी कथासंग्रहासह संपादन, समीक्षा प्रांतातील साहित्य लेखन केले आहे. अंबाजोगाईत शिक्षण आणि वैजापूर, गंगापूर, बीड येथील महाविद्यालयात त्यांनी मराठी विषय अध्यापनाचे कार्य केले. त्यांचे साहित्य महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागलेल्या आहेत. त्यांची “लाल चिखल” ही कथा अनेक रूपाने वाचक व साहित्याचे अभ्यासक यांच्या मनात कायम कोरली गेली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच साहित्य वर्तुळात शोककळा पसरली.