संभाजी भिडे हे आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. विश्वाचा संसार सुखाने चालण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हवेत, बुद्ध नव्हे, असं म्हणत त्यांनी मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं ते म्हणाले.
नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये भिडे यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते. संभाजी भिडे यांनी सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्यावतीने तरूणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागृती व्हावी यासाठी १९८२ मध्ये त्यांनी दुर्गामाता दौड सुरू केली होती. यावेळी बोलताना भिडे गुरूजी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचं बोलले. त्यांची चुक महाराष्ट्र दुरूस्त करू शकतो आणि ते काम आपलं आहे. देशाने जगाला बुद्ध दिला असला तरी बुद्ध काही उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच हवेत,” असंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिल्याचे ते म्हणाले होते. तसंच भारताने कायमच जगाला एकत्र राहण्याचा आणि शांतीचा संदेश दिला असल्याचेही ते म्हणाले होते.