नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला आहे. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला आलेला अनुभव लिहिला आहे. तसंच नाशिकमध्ये महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणून दिले नाहीत असा आरोप केला आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे संयोगीताराजे यांनी पोस्टमध्ये?

हे श्रीरामा,स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणाऱ्या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे…हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे,माणसाने माणसाशी माणसासम वागणे..
आपण सर्वजण देवाची लेकरे…आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.

त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हटली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही?

अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!

संयोगीताराजे छत्रपती

अशी पोस्ट संयोगीताराजे छत्रपती यांनी आपल्या इंस्टाग्रामवर लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील तथाकथित महंतांनी ‘पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मात्र वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे महंतांनी सांगितले, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजेंनी रामनवमीच्या दिवशी केल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji raje chhatrapati wife sanyogeeta raje chhatrapati post viral about kalaram temple mahant banning chanting scj