मुंबईमधील ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलेत. याच आरोपांमध्ये मंगळवारी फडणवीस यांनी मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचं वक्तव्य केल्यानंतर मलिक यांनी थेट सनातनचा उल्लेख केल्याचं पहायला मिळालं. मात्र यावरुन आता सनातन स्ंस्थेने स्पष्टीकरण दिलं आहे. संस्थेने दाऊदची कोणतीही मालमत्ता खरेदी केलेली नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी यासंदर्भातील एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. “मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून, प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील अ‍ॅड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि अ‍ॅड्. अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही,” असं चेतन राजहंस यांनी म्हटलं आहे.

तसेच, “पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेसंदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करू नये. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी, अशी अपेक्षा आहे,” असंही सनातन संस्थेची बाजू मांडताना चेतन राजहंस म्हणाले आहेत.

“नवाब मलिक यांनी सनातन संस्थेचे नाव घेऊन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्यांच्यावर दहशतवादाशी संबंधित गुन्हेगारांकडून थेट जमीन घेतल्याचा आरोप झाला आहे, तर नवाब मलिक ज्या दाऊदच्या जमिनीचा उल्लेख करत आहेत, ती जमीन केंद्र सरकारने जप्त करून लिलाव केलेली आहे. त्यामुळे अ‍ॅड्. श्रीवास्तव यांनीही ती दाऊदकडून घेतलेली नसून सरकारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे,” असं चेतन राजहंस म्हणाले आहेत.

“असत्य माहितीच्या आधारे स्वतःची लंगडी बाजू सावरण्याचा त्यांचा प्रयत्न उघडा पडला आहे. या संदर्भात सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविषयी नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आम्ही इशारा देत आहोत,”असं चेतन राजहंस म्हणालेत.

नवाब मलिक काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं होतं. “मी गैरप्रकारे किंवा दबाव टाकून कुठलीही संपत्ती घेतली नाही किंवा अंडरवर्ल्डकडून संपत्ती घेतली नाही तरीही माझा संबंध अंडरवर्ल्डशी जोडायचं असेल तर दाऊद कासकरचं कोकणातील घर हे सनातन संस्थेने घेतले मग सनातन आणि दाऊद यांचा संबंध आहे असं समजायचं का?,” असा प्रश्न विचारलेला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanatan sanstha react on nawab malik comment says we do not have any property which previously belongs to dawood ibrahim scsg