सांगली : अवेळच्या धुक्यामुळे यावर्षी आंबा मोहर मोठ्या प्रमाणात करपून गेल्याने आंबा उत्पादनात ४० टक्के घट येण्याची भीती केसर आंबा उत्पादक गजानन पाटील यांनी व्यक्त केली. तसेच सध्याचे हवामान अतिउष्ण असल्याने कोवळ्या आंब्याची गळती होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाटील यांची खरसुंडी येथे बलवडी घाटाशेजारी पाच एकर आंबा बाग असून, दरवर्षी या बागेतील केसर आंब्याची दुबईसह युरोपीय राष्ट्रात निर्यात होते. यावर्षी लांबलेल्या मान्सूनमुळे आंब्याला मोहर येण्यास विलंब झाला. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मोहर येणे अपेक्षित असताना मान्सूनमुळे नोव्हेंबरच्या दुसरे आठवड्यात मोहर येण्यास प्रारंभ झाला. यामुळे हंगाम तीन आठवडे पुढे गेला. मात्र, याच दरम्यान धुके पडल्याने मोहरवर करपा रोग पडल्याने काही झाडांची मोहर गळून गेला. थंडीचा हंगामही एकसारखा नसल्याने फुलोरात फळधारणा होण्याची क्रिया धिम्या गतीने झाली. सध्या थंडी कमी झाली असून, उन्हाचा तडाखा वाढला आहे. जी फळे ५० मिलीमीटरपेक्षा मोठी आहेत, त्या फळांवर याचा फारसा परिणाम होत नसला तरी याहून कमी आकाराची फळे वाढत्या उन्हाने गळून पडू लागली आहेत. धुक्यामुळे मोहर जळल्याने आणि थंडी गायब होऊन अचानक वाढलेल्या तापमानामुळे होत असलेल्या फळगळतीमुळे यावर्षी उत्पादन ३५ ते ४० टक्के घटणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli fear of decline in mango production due to changing climate ssb