सांगली : दीर्घ आजाराने मृत्यू झालेल्या मुलावर अग्निसंस्कार करून नातलग घरी येताच या अतिव दु:खाच्या धक्क्याने आईचेही काही तासांत निधन झाल्याची घटना कुमठे (ता. तासगाव) येथे घडली. मायलेकाचे रक्षा विसर्जन विधीही एकाच वेळी करण्याची वेळ नातेवाईकांवर आली.
कुमठे येथील जिल्हा परिषदेजवळ वास्तव्य असलेल्या पाटील कुटुंबावर मंगळवारी सकाळी पहिला आघात झाला. पंचक्रोशीत कसलेला पैलवान अशी ख्याती असलेल्या अविनाश महादेव पाटील (वय 54) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. पै-पाहुण्यासह गावातील लोकांना निरोप पोहच झाले. पैलवानकी केली असल्याने गोतावळा, ओळखीही खूप होत्या. यामुळे अंत्यविधीसाठी पाहुण्यासह आप्त स्वकिय मोठ्या प्रमाणात गोळा झाले.गावच्या ओढ्याकाठी असलेल्या स्मशान भूमीत अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यविधी आटोपून जमलेले आप्तस्वकिय आप-आपल्या घरी पोहचले.
अंत्यविधी आटोपून सर्वजण घरी पोहचले असतील, नसतील एवढ्यात पैलवानांच्या आई सुधाताई महादेव पाटील वय 75 यांना मुलाच्या मृत्यूचा धयका बसल्याने मुलाचा अंत्यविधी पार पडल्याचे समजताच अस्वस्थ झाली. माझ्या पोटी जन्मलेला मुलगा माझ्या अगोदर कसा गेला असा आक्रोश करत ती बेशुध्द झाली. तिला काय झाले हे पाहण्यासाठी डॉयटर घरी येईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर सात ते आठ तासात तिनेही देहत्याग केला. कुमठेकरांना हा दुसरा धक्का ठरला असला तरी आई व मुलाचे एकाच दिवशी मृत्यू येण्याचे आक्रीत घडले अशीच चर्चा गावात सुरू होती.
गावकर्यांनी वृध्द महिलेवर त्याच रात्री मुलाच्या चितेचा अग्नि शांत होण्यापुर्वीच आईच्या चितेलाही अग्नि दिला. गुरूवारी मायलेकांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रमही एकाच ठिकाणी करण्यात आला. गावकर्यांनी, भावकीने माय लेकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याचा शोक व्यक्त करणारे फलक एकत्रच लावून आदरांजली वाहिली.