राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्यात राम मांसाहारी होता, असे वक्तव्य केले. त्यानंतर राज्यभरात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपा, शिवसेना शिंदे गटाकडून याचा प्रखर विरोध करण्यात आला आहे, तसेच आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशीही काहींनी मागणी केली आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी वेगळाच सूर लावला. “जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याला सरळ अर्थाने घेऊ नका. शरद पवार यांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर बोलतात. तेव्हा ती शरद पवारांची भूमिका असते. शरद पवारांनी ते जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून वदवून घेतले असावे”, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

संजय शिरसाट पुढे म्हणाले की, आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर ते चुकीचे बोलले, असे शरद पवार कुठेही म्हणाले नाहीत. याचा अर्थच त्यांची याला मूकसंमती आहे. आपल्यातलेच लोक आपल्या देवावर असे विधान करतात, हे वाईट आहे. दुसऱ्या धर्मातील दैवताबद्दल आव्हाड बोलले असते तर त्यांचे कपडे आतापर्यंत फाडले गेले असते, असाही आरोप शिरसाट यांनी केला. आव्हाड स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःला मतं कशी मिळतील, याचाच विचार करत असतात. त्यातून त्यांनी हे विधान केले असल्याचे दिसते. राम मंदिराच्या उदघाटनानिमित्त संबंध देशभर उत्साहाचे वातावरण असताना असे विधान करून हिंदू धर्मीयांच्या भावनांवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले, अशी टीका शिरसाट यांनी केली.

हे वाचा >> अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांना टोला, रामचरितमानसच्या ओळी पोस्ट करत म्हणाले; “अर्ध्या अभ्यासकांसाठी…”

जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन काल केलेल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. ही पक्षाची भूमिका नसून माझे वैयक्तिक मत होते, असेही ते म्हणाले. आव्हाडांच्या या भूमिकेवरही शिरसाट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पक्षाच्या मंचावर बोलल्यानंतर ती पक्षाचीच भूमिका होत असते. आज मी संजय शिरसाट म्हणून पत्रकार परिषद घेत असताना मी पक्षाचीच भूमिका मांडत आहे. सहज उठून कुणालाही शिवी द्यायची आणि मग खेद व्यक्त करायचा, ही कुठली पद्धत आहे. गांधीजी ओबीसी होते का? त्यांची तीन वेळा हत्या करण्याचा प्रयत्न झाला, हे तुम्हाला कुणी विचारायला आले होते का?”, असा संतप्त सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.

राम वनवासात काय खात होते? याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे. या विषयावर दहाचा भोंगा बोंबलताना आज दिसला नाही. म्हणजे याच्यावर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची मूकसंमती आहे. आव्हाड यांना आम्ही किंमत देतच नाही, पण इतर मोठ्या नेत्यांनी त्यांच्या तोंडी हे भरविले, हे निश्चित सांगतो, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा >> ‘राम मांसाहारी होता’, वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम, म्हणाले; “वाल्मिकी रामायणातला तो उल्लेख…”

स्वयंघोषित हिंदुत्ववादी कुठे आहेत?

संजय शिरसाट यांनी यानिमित्ताने शिवसेना उबाठा गटावरही टीका केली. ते म्हणाले, “दुर्दैव असे आहे की, जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे म्हणतात. आमच्याकडे हिंदुत्वाचा वारसा आहे, असे म्हणणाऱ्या लोकांनी आतापर्यंत एकही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा निषेध नोंदविला नाही. मतांसाठी लाचारी करणाऱ्या या मंडळींना जनता आगामी निवडणुकीत निश्चितच धडा शिकवेल. एक लक्षात घ्या, हिंदूच्या भावना भडकविण्याचा किंवा देवदेवतांचा अपमान करण्याचा प्रयत्न कराल, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.”

मी इतिहासाचा विपर्यास केलेला नाही

“मी महाराष्ट्राला अनेकदा संबोधित करत असतो. मी इतिहासाचा विपर्यास करत नाही. विकृतीकरण माझं काम नाही. मी जे काही बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, विठ्ठल सगळी एकच रुपं आहेत. मी श्रीरामांबद्दल बोललो की ते मांसाहरी होते. जे याविरोधात बोलत आहेत त्यांच्या माहितीसाठी वाल्मिकी रामायणात अयोध्याकाण्ड आहे. त्यात एका श्लोकाचा संदर्भ आहे. तो मला वाचायचा नाही. मात्र तो उपलब्ध आहे तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही तो वाचू शकता असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना उद्देशून म्हटलं आहे. मी ते वाचत नाही कारण मला वाद वाढवायचा नाही.”