शतकानुशतके देव, देश, धर्माचे रक्षण करून संस्कृती आणि परंपरा जोपासणा-या गुरव समाजाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी याच गुरव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या संत काशीबा यांच्या नावाने युवा आर्थिक महामंडळ स्थापन करून त्यासाठी सुरूवातीला ५० कोटींची तरतूद करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
सोलापुरात रविवारी गुरव समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संत काशीबा युवा विकास महामंडळाची घोषणा केली. या योजनेचा भविष्यात विस्तार करण्याची ग्वाही त्यांनी दिली.विजापूर रस्त्यावर नेहरू नगरच्या शासकीय मैदानावर झालेल्या या अधिवेशनाचे आयोजन राष्ट्रीय गुरव समाज महासंघाने केले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सोलापूरचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, माजी मंत्री सुभाष देशमुख, विजय देशमुख, राणा जगजितसिंह पाटील, सचिन कल्याणशेट्टी, ॲड. शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत, समाधान अवताडे, ज्ञानराज चौगुले आदी आमदार उपस्थित होते. गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष विजयराज शिंदे यांनी स्वागत व प्रास्तविक केले.
आपले सरकार संपूर्णपणे सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, दीनदुबळ्यांचे आहे. गेल्या पाच महिन्यात त्याची प्रचिती सर्वांना आल्याचा दावा करीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकांच्या मनातल्या या सरकारला गुरव समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. म्हणूनच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचे पाऊल सातत्याने पडत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवतत्वांनी निर्मिती झालेला गुरव समाज दधिची ऋषींपासून वारकरी सांप्रदायातील संत काशीबांपर्यंत नाते सांगणारा आहे. पिढ्यानपिढ्या मंदिरे सांभाळून ईश्वराची सेवा आणि लोकप्रबोधन करणाऱ्या गुरव समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची संधी आपल्या सरकारला मिळाली आहे. या समाजाच्या उत्पन्नाची साधने पुन्हा मिळवून देण्यासाठी आपले सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सुशीलकुमार शिंदे यांनी गुरव समाज स्वाभिमानाने जगणारा आणि खेड्यातील देवाची सेवा करणारा गुरव समाज आर्थिक विवंचनेत राहिला तर देवापुढे नैवेद्य कोण खाणार ? या समाजाला विकासरूपी नैवेद्य आमच्या सत्ताकाळातही मिळाला नाही. किमान आता तरी मिळायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन झाले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.
आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही..
राज्य गुरव समाजाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खास शैलीत चिमटे काढले. लोकहितासाठी आपले सरकार अहोरात्र काम करीत आहे. कामांच्या वाढत्या व्यापामुळे थोडीशीचा झोप घ्यावी लागते. एरव्ही सदैव जागे राहावे लागते. कारण सरकारच्या अनेक चांगल्या कामांवरही टीका करण्याची विरोधकांमध्ये स्पर्धा लागली आहे. परंतु जेवढे आरोप होतील, त्याच्या दुप्पट कामे करू. शेवटी आम्ही देणारे आहोत,घेणारे नाहीत, अशा शब्दात विरोधकांना टोला मारण्याची संधी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली.