राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरून बराच वाद आणि चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. संभाजीराजे यांनी आज एक ट्विट करून “मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये,” असं आवाहन सारथी संस्थेसंदर्भात सातत्यानं आवाज उठवत असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे.
सारथीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणानंतर संस्था बंद करण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबवल्याचं वृत्तही समोर आलं होतं. मात्र, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चांनं संस्थेचा कारभार असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्या मागणी केली. त्यावरून वडेट्टीवार यांनी आरोप केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले ट्विट करून दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असं आवाहन केलं आहे.
“मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले. त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही,” असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.
मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही.
(1/2)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 6, 2020
आणखी वाचा- सरकार पडणार?, मराठा आरक्षण व सारथी; तिन्ही प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
काय म्हणाले होते वडेट्टीवार?
“मी सारथीसाठी प्रामाणिकपणे काम करतोय. मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असं वाटत असल्याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे”, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.