कराड : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मलकापूर (ता. कराड) येथे भाजपतर्फे गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता महिला मेळावा आयोजिला आहे. मेळाव्यास भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
बैल बाजार रस्त्यावरील गणपती मंदिराजवळच्या पटांगणावर होणारा हा मेळावा वचनपूर्ती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्वात मोठा कामगार व महिला लाभार्थी मेळावा ठरणार आहे. त्यात महिला बांधकाम कामगारांचा सन्मान व साहित्य वाटप तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे नवनिर्वाचित संचालक भरत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, उत्तरा भोसले, गौरवी भोसले, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, चित्रलेखा माने-कदम, सुवर्णा पाटील, मनीषा पांडे, पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, साताऱ्याचे सहायक कामगार आयुक्त नितीन कवले यांची मेळाव्याला उपस्थिती असणार आहे.