सातारा: चल ग सये वारुळाला, जाऊ या नागोबाला पुजायाला… असे म्हणत संपूर्ण सातारा जिल्ह्यात श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाई येथे धर्मपुरी घाटावरील नागोबाची मोठी यात्रा परंपरागत पद्धतीने भरली होती. गावोगावी महिलांनी वेगवेगळे खेळ खेळत नागपंचमी उत्साहात साजरी केली.

रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत महिलांनी, तसेच मुलींनी गावात विशेषत्वाने गावाबाहेर असणाऱ्या दगडी नागदेवतेचे पूजन करून आपल्या सर्व परिवारासाठी नागदेवतेकडे प्रार्थना केली. त्यानंतर महिलांनी फेर, फुगड्या घालून हा सण उत्साहात साजरा केला. नागदेवतेला लाह्या, दूध व पांढरी फुले, तसेच आघाडा, दुर्वा, बेल वाहून पंचोपचार पूजा करून महिलांनी एकमेकीला हळद-कुंकू लावून सौभाग्याचे वाण दिले. सातारा जिल्ह्यात विशेष करून नागपंचमीला खास करून ग्रामीण भागात उंच झाडाला झोके बांधून झोक्यावर बसून महिलांनी विशेष आनंद लुटला. संगम माहुली व लिंब बारामोटेची विहीर परिसरात हे झोके खेळण्यासाठी महिलांबरोबर लहान मुलीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, सातारा शहरानजीकच्या कृष्णानगर परिसरात असलेल्या श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात आवारात असलेल्या दगडी नागमूर्तीची विशेष पूजा करून महाआरती करण्यात आली. मंदिराच्या ब्रह्मवृंदांकडून या नागदेवतेला चंदन व हळदीचा लेप लावून शहाळ्याच्या पाण्याचा, तसेच दुधाचा अभिषेक घालण्यात आला. तसेच विविध फळे आणि नारळाच्या फुलांनी सजावट करून नैवेद्य, आरती करण्यात आली. या वेळी परिसरातील अनेक भाविक विशेष करून महिलांची संख्या विशेष लक्षणीय दिसून येत होती. मंदिराचे वतीने या नागदेवतेचे मंदिर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून, दर वर्षी नागपंचमीला दर्शनासाठी येथे गर्दी होत असते.

वाई येथील धर्मपुरी घाटावर असणाऱ्या दगडी नागोबाच्या प्रतिमेची पारंपरिक पद्धतीने मानकरी नाभिक समाजाने पूजा केली. येथील नागोबाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा भरते. वाई शहर व आजूबाजूच्या परिसरातून आणि गावातून मोठ्या संख्येने मुली, वृद्धा, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी महिलांची गर्दी वाढल्याने या परिसरात पुरुषांना दर्शन बंद करण्यात आले होते. किसन वीर चौक परिसरात मोठी गर्दी झाली होती. महिलांची गर्दी जास्त असल्याने पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, उपनिरीक्षक अमित सुर्वे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. या यात्रेनिमित्त वेगवेगळी खेळणी आणि वस्तूंची दुकाने सकाळपासून लागली होती. येथे खरेदीसाठी मोठी गर्दी होती. गावोगावी महिलांनी स्थानिक मंदिरातील नागप्रतिमेची व वारुळाची पूजा केली. मोठ्या उत्साहात नागपंचमी जिल्ह्यात साजरी झाली.