सातारा : सातारकर रसिकांना आतुरता असलेला ८५ वा औंध संगीत महोत्सव शनिवारी (दि.११ रोजी होणार आहे. महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि प्रसिद्ध कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार असल्याची माहिती शिवानंद संगीत प्रतिष्ठानच्या विश्वस्त श्रीमती अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांनी दिली. महोत्सव सर्व संगीत रसिकांना खुला असणार आहे. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

दरवर्षी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे औंध संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेली ८४ वर्षे हा महोत्सव सुरू आहे. १९४० साली औंध संस्थानचे दरबारी गायक पं. अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा व व्हायोलिन वादक पं. गजानन बुवा जोशी या पिता-पुत्रांनी केली.

संगीत महोत्सवात पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी, श्रीमती रोहिणी भाटे, गिरिजादेवी, पंडित के.जी. गिंडे, सुलतान खाँसाहेब, पं. मधुकर जोशी, पद्मश्री पं.उल्हास कशाळकर, पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, यशवंत बुवा जोशी, अश्विनी भिडे-देशपांडे, योगेश समसी, पं.वेंकटेश कुमार, निलाद्रीकुमार, शुभा मुद्गल अशा अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांनी हजेरी लावली आहे.

महोत्सव तीन सत्रांमध्ये होणार आहे. सकाळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. गायिका अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांच्या सहगायनाने सुरुवात होईल. ‘रियाझ ‘ या स्मरणिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. महोत्सवात अभिषेक बोरकर यांचे सरोदवादन. राजेंद्र अंतरकर यांचे तबला वादन, अमिता पावगी – गोखले, प्राजक्ता मराठे यांच्या गायनाने होईल.

सुधीर नायक यांचे संवादिनी वादन, पं. अरुण कशाळकर यांचे गायन, अनन्या गोवित्रीकर यांच्या कथक नृत्य, पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांचे गायन, पं. सुरेश तळवलकर यांची तबला साथ, पार्थ भूमकर आणि रोहित खवले यांची पखवाज जुगलबंदी, जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल.

विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध गायिका विदुषी अपूर्वा गोखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ संगीत विद्यार्थ्यांना घेता येईल. महोत्सव सर्व संगीत रसिकांना खुला असणार आहे. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांनी केले आहे.