सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयात करोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी सांगितले. साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी अडीच वर्षांनंतर करोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यांपैकी एक कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर रहिमतपूर येथील रहिवासी असणारी मृत वृद्धा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. करोना झाल्यानंतर अंतिम स्तरावर ती रुग्णालयात दाखल झाली होती.

रुग्णालयातील करोना वार्डमध्ये तिला जीवरक्षक यंत्रणेवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज त्या वृद्धेचा मृत्यू झाला. दरम्यान आज नव्याने दोन रूग्ण दाखल झाले असून यांच्यावरही कराडमध्ये उपचार सुरू असल्याने जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ३ झाली आहे.