सातारा: सातारा शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या उंबरकर टोळीतील दोघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी हे आदेश दिले आहेत.
स्मितेश उर्फ सागर दिलीप उंबरकर ( मोळाचा ओढा व सैदापूर, सातारा) व नरेश शेरसिंग सुनार ( शुक्रवार पेठ, सातारा) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या तडीपार प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा राजीव नवले यांनी चौकशी केली होती. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीप्रमुख उंबरकर व सदस्य याच्यावर दरोडा टाकणे, जबरी चोरी, खंडणी, बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे, अवैध शस्त्रांचा वापर, लोकांवर कोयत्याने वार यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. त्यांना वेळोवेळी अटक करून तसेच प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या.
सातारा तालुका परिसरातील लोकांना या टोळीचा उपद्रव होत होता. या दृष्टीने शाहूपुरी पोलिसांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची हद्दपार प्राधिकरणासमोर होऊन दोघांना दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
हद्दपार प्राधिकरणा पुढे सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सचिन माने, राहुल दळवी, केतन शिंदे यांनी योग्य तो पुरावा सादर केला.