साताऱ्यातीलु पुसेगावात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने तान्ह्या बाळासह तिघींना गाडीसह पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यावेळी घटनेतील एका महिलेने दाखवलेले प्रसंगावधान आणि धैर्यामुळे चोरट्याचा बेत फसला. पुसेगाव (ता.कोरेगाव) येथे रात्री सेवागिरी मंदिरा समोर अगदी मध्यवर्ती ठिकाणी हा थरारक प्रसंग घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साताऱ्यातील वकील महेश गोरे हे पत्नी जयश्री, चार महिन्याचा मुलगा, आठ वर्षाच्या मुलगी, भाची व भाऊजींसह कामानिमित्त शिखर शिंगणापूर येथे गेले होते. शिंगणापूरहुन परत येत असताना रात्रीच्या सुमारास ते पुसेगाव येथे तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी महेश आणि त्यांचे भाऊजी हे दोघेही गाडीतून उतरले. यावेळी गाडीत जयश्री गोरे या चालकाच्या लगतच्या सीटवर बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळ त्यांचे लहान बाळ होते. दरम्यान यावेळी अचानक गाडीत एक युवक घुसला आणि काही समजण्याच्या आत त्याने गाडीत कोणीच पुरुष दिसत नसल्याचं बघत भरधाव वेगात गाडी पळविली. तो गाडी घेऊन भरधाव वेगाने साताऱ्याच्या दिशेने निघाला.

मुलींनीही चोरट्याला मारहाण केली –

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जयश्री गोरेंसह गाडीतील सर्वजण घाबरले. यावेळी जयश्री यांनी लहान बाळासह युवकाला मारहाण करायला सुरुवात केली, त्याला गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र तो गाडी अधिक भरधाव वेगाने पळवू लागला. सुमारे अर्धा एक किलोमीटर आणि दहा पंधरा मिनिटांपर्यंत दोघांमध्ये झटापट सुरु होती. जयश्री यांनी अक्षरशः लाथाबुक्क्यांनी युवकास मारले. यावेळी लहान मुलं खाली पडले. सोबतच्या नातेवाईक मुलींनीही युवकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान जयश्री यांनी हँण्डब्रेक ओढला. मात्र, तरी देखील या चोरट्याने गाडी जोरात चालवत त्यांना शांतबसा नाहीतर मारुन टाकेन अशी धमकी दिली.

चालत्या गाडीत चोरट्याशी झटापट –

सर्वांनी युवकाला जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली. जयश्री यांनी गाडीच्या स्टेरिंगवर लाथ मारली यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी एका वळणावर बंद पडली व एका लाकडाच्या ढिगाऱ्यावर जावून आदळली. त्यानंतर त्या युवकाने पलायन केले. चालत्या गाडीत झालेल्या झटापटीत बाळासह जयश्री गोरे जखमी झाल्या. त्यांचे पती व नातेवाईक पाणी घेऊन आले असता गाडी त्या ठिकाणी नव्हती. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता गाडी भरधाव वेगात गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यांनी ताबडतोब तेथील युवकांना सांगून गाडीचा पाठलाग केला. गाडी सापडल्यावर वकील महेश गोरे पुसेगाव पोलिसात तक्रार दिली.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्या युवकाची ओळख पटवून त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी अभिजित फडतरे यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara thieves kidnap three with baby msr
First published on: 27-06-2022 at 18:12 IST