सावंतवाडी : यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या मनस्तापात आहेत. दहावीचा निकाल लवकर लागूनही शिक्षण विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे अकरावीचे प्रवेश लांबले आहेत. गणेश चतुर्थी जवळ येऊनही अनेक विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळालेला नाही, त्यामुळे महाविद्यालये सुरू होण्यासही उशीर होत आहे.

शिक्षण विभागाने यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली, पण यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. सुरुवातीला शिक्षण विभाग गोंधळलेला असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

येत्या ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता असतानाही, व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश अद्याप सुरू आहेत. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ११ ऑगस्टपर्यंत व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश पूर्ण करता येतील, असे सांगितले आहे. यामुळे महाविद्यालये सुरू होण्याची तारीख पुढे ढकलली गेली आहे.अनेक विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे असलेल्या शाखेत प्रवेश मिळाला नाही, त्यामुळे त्यांना दुसऱ्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची वेळ आली आहे. काही महाविद्यालयांनी मात्र उपलब्ध विद्यार्थ्यांसह वर्ग सुरू केले आहेत.

प्रवेशासाठी सुरू असलेल्या या गोंधळाला शिक्षण विभागच जबाबदार असल्याची विद्यार्थ्यांची आणि पालकांची भावना आहे. अकरावी प्रवेशाला विलंब होत असतानाही, सत्ताधारी पक्षाने या विषयावर मौन बाळगले आहे. आता ११ ऑगस्टपर्यंत कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तरी अधिकृतपणे अकरावीचे वर्ग सुरू होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेत सायन्स कडे प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. पण ऑनलाईन पध्दतीने प्रवेश देण्याचा निर्णय झाला असल्याने काही भागात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. आता त्यासाठी अतिरिक्त वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळावी म्हणून काही संस्था प्रयत्न करत आहेत. मात्र कोटा पद्धतीची प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर नेमके किती विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट झाले नाहीत तो आकडा समोर येईल असे काही संस्था चालकांनी म्हटले आहे.