सावंतवाडी : आरोग्यसेवांच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचं समोर आलं आहे. दररोज सरासरी सहा रुग्ण उपचारासाठी शेजारच्या गोवा-बांबोळी येथे पाठवले जात आहेत. गेल्या चार महिन्यांत, म्हणजेच एप्रिल ते जुलै या कालावधीत, तब्बल ७४५ रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्याला रेफर करण्यात आलं आहे. खासगी रुग्णवाहिका आणि इतर वाहनांनी गोव्यात गेलेल्या रुग्णांची संख्या याहून अधिक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊनही परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट झाली आहे. जिल्ह्याचं रुग्णालय असो किंवा सावंतवाडीचं उपजिल्हा रुग्णालय, गंभीर रुग्णांवर एका मर्यादेपलीकडे उपचार करणं डॉक्टरांना शक्य होत नाही. उपलब्ध डॉक्टर आपल्यापरीने प्रयत्न करतात, पण सुविधांचा अभाव आणि रिक्त पदांमुळे त्यांना रुग्णांना गोवा-बांबोळी येथे पाठवावं लागत आहे.
रिक्त पदे आणि डॉक्टरांवरील ताण
जिल्ह्यात आवश्यक आरोग्य सुविधांचा अभाव आहे. महत्त्वाचं म्हणजे, अनेक डॉक्टरांची पदे रिक्त आहेत, ज्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. काही रुग्णालयात तर हार्ट फिजीशियन आणि न्यूरोलॉजिस्ट सारखी महत्त्वाची पदे अनेक वर्षांपासून भरलेली नाहीत. शासन आदेश देऊनही काही डॉक्टर रुजू होत नाहीत. या गंभीर प्रश्नावर राज्य सरकार कसा तोडगा काढणार, हा मोठा प्रश्न आहे.
आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळात या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधलं होतं, पण त्यानंतरही सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना आहे. आता या रुग्णालयांची श्रेणीवाढ (upgradation) करण्याची मागणीही जोर धरत आहे, जेणेकरून रुग्णांना जिल्ह्याबाहेर जावं लागणार नाही.